लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड

0
10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती ह्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या निवडीबाबत आनंद व्यक्त केला.

महिला दिनी
मोठी भेट ः मूर्ती

राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी, त्या सध्या भारतात नाहीत. परंतु, महिला दिनानिमित्त त्यांना मिळालेली ही मोठी भेट आहे. देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन जबाबदारी मिळाली आहे असे म्हटले आहे. मूर्ती यांनी या निवडीबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये, राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड केल्याचा मला खूप आनंद झाला आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधा मूर्ती यांनी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान दिले आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती हा आपल्या नारीशक्तीचा एक सशक्त पुरावा आहे. आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेतील उपस्थिती महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते असे सांगून त्यांनी यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी सुधा मूर्ती यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पद्मभूषण, पद्मश्रीने सन्मानित
सुधा मूर्ती या कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील योगदानासाठी ओळखल्या जातात. लेखिका असण्यासोबतच त्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षाही होत्या. सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.