गगनयात्री

0
46

गगनयान ह्या भारताच्या पहिल्यावहिल्या महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवडल्या गेलेल्या चार अंतराळयात्रींची नावे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इस्रो दौऱ्यात समारंभपूर्वक जाहीर केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला अशी ह्या धाडसी वीरांची नावे आहेत. आपल्या जीवाची बाजी लावण्यास हे वीर सज्ज आहेत. खरे तर त्यांची निवड चार वर्षांपूर्वीच करण्यात आलेली होती, परंतु त्यांची नावे मात्र उघड करण्यात आली नव्हती. एकीकडे मानवाला घेऊन अवकाशात जाणार असलेल्या अवकाशयानाच्या विविध चाचण्या पार पाडत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अंतराळवीरांची निवड करण्यापर्यंत सर्व कामे समांतरपणे सुरू होती. अंतराळवीरांची निवड करण्यासाठी चार वर्षांपूर्वीच भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांमधून खडतर चाचणींअंती ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यांना नंतर रशियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. तेथून परतल्यावर त्यांना बेंगलुरूमध्ये अधिक प्रशिक्षण दिले गेले. परंतु आजतागायत ही नावे गोपनीय ठेवली गेली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रोशी संबंधित अठराशे कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन केले, तेव्हा ही नावे त्यांनी घोषित केली, त्यामागे राजकीय लाभाचा विचार असू शकतो, परंतु गगनयान मोहिमेला मोठी गती आता लाभेल. काल पंतप्रधानांनी तीन महत्त्वपूर्ण अवकाश संशोधनविषयक सुविधांचेही उद्घाटन केले आहे. त्यामध्ये श्रीहरीकोट्यातील पीएसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटी, महेंद्रगिरी येथील सेमिक्रायोजेनिक इंजिन टेस्टिंग फॅसिलिटी आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजे व्हीएसएससीमधील ट्रायसॉनिक विंड टनल यांचा समावेश आहे. नव्या अद्ययावत पीएसएलव्ही इंटिग्रेशन फॅसिलिटीमुळे यापुढे वर्षाला सहा अवकाशउड्डाणांवरून आपल्याला पंधरा उड्डाणांची संख्या गाठणे शक्य होणार आहे. महेंद्रगिरीतील क्रायोजेनिक इंजिन चाचणी सुविधेलाही अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे देशांतर्गत छोटी क्रायोजेनिक इंजिने विकसित करणे अधिक सुलभ होऊ शकेलच. एकेकाळी हे क्रायोजेनिक इंजिन मिळवण्यासाठी काय काय करावे लागले हा इतिहास सर्वज्ञात आहे. येणाऱ्या गगनयान मोहिमेमध्येही क्रायोजेनिक सीई 20 हे इंजिनच वापरले जाणार आहे. मानवी अंतराळवीर वाहून नेण्यास ते सक्षम आहे. ह्या सुविधेमुळे ह्या इंजिनांची पेलोड म्हणजे वजन वाहून नेण्याची क्षमताही वाढवता येऊ शकेल. व्हीएसएससी म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या ट्रायसॉनिक विंड टनेलमध्ये नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित चाचण्या घेण्याची सोय असेल. येणाऱ्या अवकाश मोहिमांना ह्या नव्या सुविधांमुळे अधिक बळ मिळेल. अवकाश संशोधन क्षेत्रामधील भारताच्या अग्रेसरत्वाची साक्ष आजवरच्या विविध यशस्वी मोहिमांनी वेळोवेळी दिलेलीच आहे, मग ती मंगलयान मोहीम असो अथवा चंद्रयान 3. आता वेध लागले आहेत गगनयानचे. मानवी अंतराळयात्री अवकाशात पाठविण्यास भारत आता पुरता सज्ज झाला आहे ही बाब खचितच सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आहे. चंद्रयान मोहिमेच्या यशाने भारताला जागतिक स्तरावर तिसऱ्या रांगेतून थेट पहिल्या रांगेत आणून पोहोचवले आणि अवकाश मोहिमांच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करीत आलेल्या जागतिक महासत्तांमध्ये त्याने मानाचे स्थान पटकावले. पूर्वी एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमध्ये अवकाश मोहिमांची तीव्र स्पर्धा असे. मात्र, नंतर रशियाच्या विघटनामुळे आणि अमेरिकेच्या अवकाश मोहिमांसंदर्भात घडलेल्या काही दुर्घटनांमुळे दोन्ही देशांनी आपल्या मानवी अंतराळमोहिमांना लगाम घातला. मात्र, ती पोकळी भरून काढत एलॉन मस्कसारखे अब्जाधीश पुढे आले आणि त्यांनी व्यावसायिक पातळीवर अवकाश सफरीचे नवे पर्व निर्माण केले. मात्र, संशोधनाची दृष्टी त्यामागे नाही. त्यामुळे भारत जेव्हा गगनयानच्या तयारीला लागला आहे, तेव्हा ती निश्चितच एक फार मोठी झेप असेल. ह्या मोहिमेसाठी अधिकाधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे. मंगळ आणि चंद्रानंतर शुक्र हेही भारताचे लक्ष्य असेल आणि 2035 पर्यंत अंतराळात भारताचे स्वतःचे अवकाश स्थानक असेल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. चंद्रयान 3 च्या यशाने जसे एक विज्ञान – तंत्रज्ञानाप्रती आस्था आणि आपुलकीचे वातावरण देशभरात निर्माण केले, तशा प्रकारचे वातावरण गगनयानमुळेही निर्माण होईल आणि नव्या पिढ्यांना त्यापासून ह्या क्षेत्रामध्ये काही करून दाखवण्याची प्रेरणा मिळेल यात शंका नाही.