गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ प्रश्‍नावरून विरोधकांचा सभात्याग

0
110

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ म्हणजे घोटाळा आहे, असा आरोप करून विरोधी कॉंग्रेस आमदारांनी काल विधानसभेत या मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पांच्या चौकशीसाठी सभागृह समिती स्थापन करण्याची जोरदार मागणी केली. परंतु सरकारने ती मान्य न केल्याने संतप्त बनलेल्या कॉंग्रेस आमदारांनी प्रश्‍नोत्तराचा तास चालू असताना सभात्याग केला.
वरील प्रश्‍नावर गोंधळ चालू असतानाच पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे सभागृहातून बाहेर गेले होते. त्यामुळे राणे सभा त्यागाच्यावेळी सभागृहात नव्हते. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी यासंबंधीचा मूळ प्रश्‍न विचारला होता. प्रकल्पासाठी जमिनी कशा दिल्या जातात? शेत जमिनीचे किंवा अन्य जमिनीचे रुपांतर न करताच जमिनी देणे हा गैरप्रकार असल्याचा आरोप नाईक यांनी केला होता. या एकाच मुद्यावरून विरोधकांनी संघटीतपणे सरकारच्या विरोधात आवाज उठविला.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेल्या १५१ प्रकल्पांपैकी ९० प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. पंधरा प्रकल्प पुढे गेलेले नाहीत तर १२ प्रकल्पांच्या बाबतीत संशय निर्माण झाल्याने सल्लागार संस्थेतर्फे चौकशी करण्याचे सरकारने ठरविले आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून वरील मंडळ प्रकल्पासाठी तत्त्वतः मान्यता देते. सीआरझेड, प्रदूषण नियंत्रण व अन्य संबंधित परवाने मिळविण्याचे काम संबंधितांचे असते. ते नसलेल्यांना मान्यता दिली जात नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
परंतु विरोधकांचे मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर समाधान होऊ शकले नाही. विरोधी नेते बाबू कवळेकर यांनी या प्रश्‍नावर सभागृह समिती स्थापन करण्याची जोरदार मागणी केली. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. रवी नाईक यांनी आयपीबी म्हणजे घोटाळाच असल्याचा आरोप केला.
सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या एकाच प्रश्‍नावर सभागृहाचा वेळ का वाया घालवतात, असा सभापती प्रश्‍न करीत होते. सभागृह समिती स्थापन करण्यास सरकार तयार नसल्याने आक्रमक बनलेले आमदार लॉरेन्स सभापतीच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घालू लागले. त्यामुळे सभापतीही संतप्त बनले. त्यांनी त्यांना आसनावर जाऊन बसण्याचा आदेश दिला. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे सभापतींनी विरोधी नेत्यांना लॉरेन्स यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंती केली. आमदार कवळेकर यांनी लॉरेन्स यांना आसनावर बसण्यास सांगितले, तेव्हा ते सभापतीच्या आसनासमोरून मागे हटले. जवळ जवळ २५ मिनिटे या एकाच प्रश्‍नावर खर्च झाली.