>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन; अखेर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत घेतली भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आदिवासी समाजाचा (एसटी) राजकीय आरक्षणाचा प्रश्न मतदारसंघ फेररचना आयोग स्थापन करून लवकर सोडवण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली येथील भेटीत दिले.
राज्यातील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमित शहा यांची काल भेट घेतली. यावेळी शहा यांनी एसटी राजकीय आरक्षणप्रश्नी लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली.
या शिष्टमंडळात राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सभापती रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर, आमदार आन्तोन वाझ, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर व एसटी समाजातील इतर नेत्यांचा समावेश होता.
राज्यातील एसटी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीपूर्वी राज्य विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला 4 जागा राखीव ठेवण्याची मागणी केली जात आहे.
गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एसटी राजकीय आरक्षणाचा पाठपुरावा करण्यासाठी शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे नेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एसटीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांची भेट घेतली होती; मात्र त्यावेळी केवळ मुख्यमंत्र्यांचीच अमित शहांसोबत चर्चा झाली. शिष्टमंडळाची शहांसोबत भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आदिवासी समाजातील नेत्यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषदेत घेऊन एसटी आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहांसोबत भेटीसाठी एसटीच्या शिष्टमंडळाला वेळ देण्यात आली होती.
आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी परिसीमन आयोग स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याची माहिती या शिष्टमंडळात सहभागी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काल दिली.
धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याविषयी
देखील अमित शहांसोबत बैठकीत चर्चा
गोव्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठकीत चर्चा केली. गोव्यातील धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेशाबाबत अमित शहा सकारात्मक आहेत, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल दिली.