ओडिसातील ‘त्या’ चालकाचा परवाना रद्दसाठी शिफारस करणार

0
7

>> वाहतूकमंत्री; कारमालकालाही नोटिस बजावणार

ओडिसा वाहतूक प्राधिकरणाला (आरटीओ) मांडवी पुलावरील अपघातासाठी जबाबदार असलेल्या चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. ओडिसातील अंकित त्रिपाठी या पर्यटकाच्या रेंट-अ-कारच्या धडकेत एक दुचाकीचालक गुरुवारी मांडवी नदीत कोसळला होता.

राज्यातील वाढत्या वाहन अपघातांबाबत मंत्री गुदिन्हो यांनी चिंता व्यक्त केली. या अपघात प्रकरणी रेंट-अ-कार मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना करण्यात आली आहे. वाहतूक खात्याने गेल्या 3 वर्षांपासून नवीन रेंट अ कार गाड्यांना परवाना देणे बंद केले आहे. रेंट अ कार मालकांनी पर्यटकांना मार्गदर्शक सूचनांनुसार (एसओपी) कार भाड्याने देणे आवश्यक आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

गोवा हे अपघाताची राजधानी बनले असून, रस्ते आणि महामार्गांचे रुंदीकरण होत असल्याने लोक बेदरकारपणे वाहने चालवत आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.