शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. सयानी यांना मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशी उपाधी जनतेने अमीन सयानी यांना दिली होती. अमीन सयानी यांनी ‘बहनों और भाईयों, अगली पायदान पें है ये गाना’ असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिनाका गीतमाला सादर केली. अमीन सयानी यांनी केवळ निवेदन केले नाही, तर अनेक गायक, गीतकार संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांच्या गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला.
मुंबईत 1932 साली जन्मलेल्या अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणून आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदी भाषेत निवेदन करण्यास सुरुवात केली आणि आपल्या गोड आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत बिनाका गीतमाला हा कार्यक्रम लोकप्रिय केला.
1952 ते 1994 इतका दीर्घकाळ चाललेला हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून गीतमालाची नोंद झाली आहे. आवाजाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या गेलेल्या अमीन सयानी यांच्यासारखा निवेदक पुन्हा झाला नाही. ‘या सम हाच’ अशी प्रतिभा असलेला एक अस्सल कलावंत हरपल्याची भावन व्यक्त होत आहे.