भाजपचे ‘लाभार्थी संपर्क अभियान’

0
7

>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या गाठीभेटी घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे आता ‘लाभार्थी संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.

राज्यातील 1725 मतदान केंद्रावर लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ गोव्यातील अनेकांना मिळत आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून 22 फेब्रुवारीला संध्याकाळी दक्षिण गोव्यातील शिरोडा येथे विकसित भारत, विकसित गोवा या उपक्रमांतर्गत एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित राहणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील सां जुझे द आरियल येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून, मुख्यमंत्री या प्रकरणी योग्य तोडगा काढणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.