कदंब वाहतूक महामंडळाच्या चालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला 15 दिवस काल पूर्ण झाले, तरी देखील सरकारी यंत्रणेने या साखळी उपोषणाची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही. दरम्यान, या संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत साखळी उपोषण तीव्र करण्याचा निर्णय काल घेण्यात आला.
या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संबंधितांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन सुध्दा त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कृती केली नसल्याने अखेर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या बेमुदत साखळी उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामगार संघटनेने यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या कदंब डेपो स्तरावर बैठक घेण्याचे ठरविण्यात आले असून, कदंब कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर पसरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मतदारसंघातील आमदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रलंबित प्रश्न मांडून पाठिंबा मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आझाद मैदानावर बेमुदत साखळी उपोषणात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.