महागाईवरून महिला काँग्रेसची केंद्रावर टीका

0
5

‘बहुत हुई मँहगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ असा नारा देऊन 10 वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात जेवढी महागाई केली तेवढी महागाई देशात कधीच झाली नव्हती, असा आरोप प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आपल्या कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या महिलांना या महागाईमुळे प्रचंड तणावाला सामोरे जावे लागत असून, घरखर्चासाठी दिलेला पैसा कसा पुरत नाही असा सवाल महिलांना त्यांचे पती करू लागले आहेत, असेही नाईक म्हणाल्या.

पेट्रोल, एलपीजी, खाद्यतेल, डाळी, साखर, रवा, लसूण, तांदुळ यांच्यासह सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महागाईवर एकही शब्द काढत नसून, ते मूग गिळून गप्प आहेत. केंद्र सरकार शेतीमालावर अनुदानही देत नाहीत, तसेच शेतीमालावरील जीएसटीही रद्द करीत नाहीत आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही देत नाहीत, असा आरोप नाईक यांनी केला.

यावेळी पत्रकार परिषदेला हजर महिला काँग्रेसच्या काही सदस्यांनी महागाई कशी वाढली आहे, त्याची माहिती देताना 2014 पूर्वी राज्यातील वस्तूंचे दर आणि आताचे दर याविषयीची माहिती पत्रकारांना दिली.
काँग्रेस सरकारच्या काळात महागाईच्या प्रश्नावरून तांडव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आता गप्प का असा सवालही बीना नाईक यांनी यावेळी केली. मात्र आम्ही गप्प बसणार नसून महागाईच्या प्रश्नावरून सरकारला जाब विचारणार आहोत. रस्त्यावर उतरणार आहोत, असे नाईक यांनी सांगितले.