>> भाजप, काँग्रेस, शिंदे गट, अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. काल त्यांनी जयपूरला जाऊन राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
56 राज्यसभा जागांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काल भाजपने आणि काँग्रेसने आपापल्या काही उमेदवारांची नावे जाहीर केली.
काँग्रेसने सोनिया गांधी राजस्थानमधून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याशिवाय अभिषेक मनू सिंघवी, डॉ. अखिलेश प्रसाद सिंग आणि चंद्रकांत हंडोरे यांनाउमेदवारी दिली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या 24 तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळाली. याशिवाय भाजपने गुजरातमधून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकीया, मयनभाई नायक आणि जसवंतसिंह परमार यांना उमेदवारी दिली. शिवसेना शिंदे गटाने मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.