यूएईतील पहिले हिंदू मंदिर एकतेचे प्रतीक बनेल

0
4

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी; बीएपीएस मंदिराचे लोकार्पण; 27 एकर जागेत उभारणी

यूएईच्या भूमीने मानवी इतिहासाचा सुवर्ण अध्याय लिहिला आहे. अबुधाबातील बीएपीएस हिंदू मंदिर संपूर्ण जगासाठी जातीय सलोखा आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनेल. अबुधाबीमध्ये एका भव्य आणि दिव्य मंदिराच्या उभारणीमागे अनेक वर्षांची मेहनत आहे. त्यात भगवान स्वामी नारायण यांचा आशीर्वाद आहे. तसेच सर्वात मोठे योगदान माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद यांचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले.

यूएईमधील पहिले हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण (बीएपीस) संस्थेच्या हिंदू मंदिराचे लोकार्पण मोदींनी केले, त्यावेळी बोलत होते. मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केले आणि नंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी मार्गस्थ झाले.

आतापर्यंत बुर्ज खलिफा, शेख झायेद मशीद आणि इतर हायटेक इमारतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या यूएईमध्ये आता आणखी एका सांस्कृतिक स्थळाची भर पडली आहे. आगामी काळात मोठ्या संख्येने भाविक येतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे लोकांशी संपर्क वाढेल. कोट्यवधी भारतीयांच्या वतीने यूएईचे महामहिम राष्ट्रपती आणि यूएई सरकारचे मनापासून आभार मानतो, असे मोदी म्हणाले.
यूएईच्या राष्ट्रपतींनी करोडो भारतीयांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यांनी 140 कोटी भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यांनी केलेल्या कामासाठी धन्यवाद हा शब्द खूपच लहान वाटतो, असेही मोदी म्हणाले.