इम्रानला कौल

0
27

पाकिस्तानच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक अपक्ष निवडून येणे ही बाब जनतेचा हा कौल माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बाजूने असल्याचे स्पष्ट करते. तुरुंगात असलेल्या इम्रानला वा त्याच्या पक्षाला निवडणूक लढवता येऊ नये, त्याच्या समर्थकांना त्याचे ‘बॅट’ हे निवडणूक चिन्हही वापरता येऊ नये याचा पक्का बंदोबस्त होऊनही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र मतदारांनी इम्रान समर्थक अपक्षांना भरभरून कौल दिलेला दिसतो. पाकिस्तानी असेम्ब्लीच्या 265 जागांपैकी तब्बल 101 जागांवर अपक्ष निवडून आले आहेत आणि हे बहुतेकजण यावेळी अपक्ष लढावे लागलेले इम्रान समर्थक आहेत. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाजला त्या खालोखाल 75 जागा मिळाल्या आहेत, तर बिलावल भुत्तोच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तानी असेम्ब्लीत स्पष्ट बहुमतासाठी 133 जागा आवश्यक ठरतात. गेल्या काही वर्षांत कोणत्याही पक्षाला पाकिस्तानात असा जनतेचा निर्विवाद कौल मिळालेला नाही. त्यात पाकिस्तानी लष्कर नेहमीच आपल्या पसंतीचे सरकार सत्तेत राहील ह्यासाठी जंग जंग पछाडत असते. ह्या निवडणुकीतही त्या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न झाला. पाकिस्तानी लष्कराला इम्रानला निवडणुकीपासून दूर ठेवायचे होते. आता जरी निवडणूक निकाल पाहता इम्रान समर्थक मोठ्या संख्येने निवडून आलेले असले, तरी प्रत्यक्षात सरकार मात्र इम्रानविरोधी पक्षाचे घडेल हे पाकिस्तानी लष्करशहा पाहतील. शरीफ आणि भुत्तो ही दोन्ही घराणी परस्परांची पारंपरिक प्रतिस्पर्धी जरी असली, तरी इम्रान खानचे वादळ थोपवण्यासाठी एकत्र यायला ते अनमनत नाहीत. गेल्या वेळी इम्रानच्या पदत्यागानंतर दोघांनी एकत्र येऊन सरकार घडवले होतेच. त्यामुळे आता देखील इम्रानच्या निष्ठावंतांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो एकत्र आल्याखेरीज राहणार नाहीत आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराचा आशीर्वाद असेल. संख्येने इम्राननिष्ठांच्या खालोखाल नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या जागा आहेत. त्यामुळे देशाचे आगामी नेतृत्व नवाज शरीफ किंवा बंधू शाहबाज शरीफ यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. पाकिस्तानी लष्कराचाही त्याला आशीर्वाद असेल. एकेकाळी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली ह्याच पाकिस्तानी लष्कराने नवाज शरीफांविरुद्ध बंड करून रातोरात सत्ता जोरजबरदस्तीने हस्तगत केली होती. अर्थात, 1999 नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या लष्कर थेटपणे सत्ता हस्तगत करण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे नवाज आणि बिलावल एकत्र येऊन घडणाऱ्या सरकारला पाठिंबा देण्याचाच पर्याय ते स्वीकारील असे दिसते. दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. उगवत्या सूर्याला दंडवत घालून अनेक अपक्षही त्यांना येऊन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनतेचा कौल मात्र इम्रानला होता हे निवडणूक निकाल स्पष्ट करतो. ह्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला. अनेक ठिकाणी मतांची फेरमोजणी देखील करावी लागली. त्यात इम्रान समर्थक निवडून येण्याच्या घटनाही घडल्या. आपण दिलेला बहुमताचा कौल नाकारून नवाज आणि बिलावल एकत्र येऊन सरकार घडवीत आहेत हे पाहणारी पाकिस्तानी जनता निमूटपणे हे स्वीकारणार का हा खरा प्रश्न आहे. पाकिस्तानचे राजकारण आजवर शरीफ आणि भुत्तो झरदारी ह्या दोन कुटुंबांमध्ये लोंबकळत राहिले. ह्या लंबकाला उबगलेल्या जनतेने मध्यंतरी इम्रान खानच्या तेहरिक इ पाकिस्तान पक्षाला सत्ता दिली. मात्र, बहुसंख्य जनतेचा पाठिंबा असूनही इम्रानला विरोधकांनी सत्तेत टिकू दिले नाही. आता निवडणुकीच्या मार्गातून इम्रानने पुन्हा धडक दिली आहे. मात्र, त्याच्या समर्थकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरीफ आणि भुत्तो एकत्र येत आहेत. पाकिस्तान दिवाळखोरीच्या दिशेने चालला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सततच्या मदतीवर त्याचे तारू टिकले आहे. पुढच्या महिन्यात सध्याच्या आर्थिक मदत योजनेची मुदत संपते. पाकिस्तानला पुन्हा आर्थिक टेकू हवा आहे. त्यासाठी हा महिना संपायच्या आधी नवे सरकार सत्तारूढ झालेले हवे आहे. त्यामुळे आता शरीफ – भुत्तो यांच्यातील वाटाघाटी सफल ठरल्यास बिलावलच्या पाठिंब्यावर नवाज किंवा बंधू शाहबाज पंतप्रधान होतील अशी शक्यता दिसते आहे. जनतेचा कौल मात्र इम्रानला आहे. पाकिस्तानवर अधिराज्य गाजवत आलेल्या शरीफ आणि भुत्तो झरदारी घराण्यांवरील जनतेचा विश्वास ढासळत चालल्याचेच हा निकाल निदर्शक आहे. अजूनही इम्राननिष्ठांना जनता कौल देते याचा अर्थ नवा पर्यायच देशाला सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर काढील अशी भाबडी आशा अजूनही जनतेला आहे.