काँग्रेसचे नेते तथा देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधानांनी ‘एक्स’वर तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली.
चौधरी चरणसिंह हे देशाचे पाचवे, तर पी. व्ही. नरसिंह राव हे देशाचे नववे पंतप्रधान होते. स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते. 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेला हा दहावा भारतरत्न आहे. यापूर्वी 3 फेब्रुवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि 23 जानेवारीला बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा करण्यात आली होती. यंदा केंद्र सरकारने आतापर्यंत पाच जणांना भारतरत्न जाहीर केले आहेत.
याशिवाय यापूर्वी मदन मोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मोदींच्या कार्यकाळात हा सन्मान मिळाला आहे. पी. व्ही. नरसिंह राव यांनी देशाच्या आर्थिक विकासाचे द्वार उघडले, तर आणीबाणीच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी चौधरी चरण सिंह लढले, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका वठवली, असे मोदींनी म्हटले आहे.