बायणातील ‘त्या’ १२० घरांना धोका

0
115

>> समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ

अरबी समुद्राच्या पातळीत वारंवार वाढ होत असल्यामुळे बायणा समुद्रकिनार्‍यावरील घरांना दिवसेंदिवस धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या घरांना तेथून हटविण्यापलिकडे दुसरा पर्याय नाही. काटे बायणा भागातील सीआरझेडचे उल्लंघन करून बांधलेल्या समुद्रकिनार्‍यावरील उर्वरित १२० घरांनाही या समुद्री भरती रेषेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही घरे समुद्री लाटांच्या विळख्यात गिळंकृत होऊ शकतात. त्यासाठी प्रशासनाने त्वरित ही घरे हटविण्यापलिकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो.
या दिवसात समुद्राच्या पातळीत वारंवार वाढ होत असून त्यामुळे राज्यात अनेक समुद्रकिनार्‍यावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. यात काटे बायणा येथील सार्वजनिक बांधकाम भूगटार प्रकल्पासमोरील समुद्र किनार्‍यावरील असलेल्या १२० घरांना धोका निर्माण झाला आहे. समुद्री भरती रेषेत वारंवार होणारी वाढ तसेच समुद्री लाटांच्या तडाख्यात या समुद्र किनार्‍याची धूप होत चालली आहे. समुद्री लाटा या घरांवर आदळून या घरांच्या खालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे यापूर्वी येथे असलेल्या अनेक घरांना जलसमाधी मिळाली आहे. तसेच समुद्र किनार्‍यालगतचे माडही भूईसपाट झालेले आहेत. यापूर्वी सीआरझेडचे उल्लंघन करुन बांधलेल्या झोपडीवजा घरे बहुतेक करून बिगर गोमंतकीयांची होती. ती त्वरित हटविण्यात आली होती. तीन टप्प्यात ही घरे कायद्याच्या सपाट्यातून कारवाईद्वारे हटविण्यात आली होती.
दरम्यान, शेवटच्या टप्प्यात राहिलेली १२० घरे ही मच्छीमारी लोकांची असून त्यांना यापूर्वीही नोटीसीद्वारे मुरगाव तालुका आपत्कालीन विभाग तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयातून घरे खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु येथील घर मालकांनी ही घरे खाली करण्यास नकार देऊन त्यांनी उच्च न्यायालयातून या आदेशाला स्थगिती आणली आहे. खरे म्हणजे ही घरे मे महिन्याच्या सुरूवातीला मोडण्याचा आदेश दिला होता. परंतु या घरमालकांनी उच्च न्यायालयात याचिका सादर करून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे या घरमालकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
आधी पुनर्वसन
दरम्यान, सध्या परिस्थिती ही वेगळीच असून समुद्रकिनार्‍याच्या पातळीत होणारी वाढ ही या घरांना धोक्याची घंटा असून यापासून या घरांतील लोकांनाही जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत. परंतु त्या लोकांनी तसे दाखवून न देता त्यांनी आपली घरे वाचवावीत तसेच आधी पुनर्वसन मगच घरे खाली करणार असा हट्ट धरला आहे. त्यामुळे आपत्कालीन विभागही त्यांच्यासमोर काही करू शकत नाही.
दरम्यान, बायणा समुद्रकिनार्‍यावर असलेल्या ‘दृष्टी’ या संस्थेचे जीवरक्षक सतत पहारा देत असून ते रात्र दिवस सतर्क राहतात. कारण ही घरे केव्हाही दिवसा किंवा रात्री समुद्राच्या विळख्यात गिळंकृत होऊ शकतात.