नवर्‍याचा घातपात : कॉन्स्टेबलच्या पत्नीची तक्रार

0
217

आपल्या नवर्‍याने आत्महत्या केलेली नसून त्याचा कुणीतरी घातपात केल्याची तक्रार मयत बटालियन पोलीस किशोर शिरोडकर यांची पत्नी आश्‍विनी शिरोडकर यांनी काल संध्याकाळी पर्वरी पोलीस स्थानकावर दिली आहे. सरकारने आणि पोलिसांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी पोलिसांना सादर केलेल्या लेखी तक्रारीत केली आहे. यावेळी तिच्यासमवेत सासरचे कुटुंबीय उपस्थित होते.
तत्पूर्वी, बिगरशासकीय संस्थेच्या तारा केरकर यांनी काल सकाळी मोरजी येथे शिरोडकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी केरकर यांनी आश्विनी शिरोडकर यांना बोलते केले. त्यावेळी नवर्‍याने आत्महत्या केल्याची शक्यता तिने फेटाळली. आम्ही सदैव एकमेकांवर विश्वास ठेवून काम करीत होतो. तो पती होताच, शिवाय चांगल्यापैकी मित्र होता. कुणीतरी त्याचा घात केला असे हुंदके आवरत आश्विनी यांनी शिरोडकर यांच्याकडे तक्रारीच्या सुरात सांगितले. किशोर शिरोडकर या बटालियन पोलिसाचा संशयास्पद स्थितीत २० रोजी पर्वरी येथे मृतदेह आढळला होता. पोलिसांनी सदर मृत्यू अनैर्सिग म्हणून नोंद केला आहे. त्याला मटका खेळण्याचे व्यसन होते. मात्र, आपण सांगितल्यानंतर तो सुधारला होता. मित्राकडून व बँकेकडून त्यांनी सात ते आठ लाख रुपये कर्ज घेतले होते. काही कर्जाची रक्कम आम्ही फेडले आहे. मात्र, कर्जामुळे तो कधीही तणावाखाली नव्हता. तो आत्महत्या करणे शक्यच नसून आपण्यास न्याय मिळावा अशी मागणी आश्‍विनी यांनी केली आहे.
धमकीचा उल्लेख
मयत किशोर यांच्या पत्नीने तिच्या पतीला पूर्वी दिलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे. एकदा किशोर शिरोडकर व त्याचे नातलग तथा आश्विनी शिरोडकर यांच्या कामावरील एका कर्मचार्‍याशी त्याचा वाद झाला होता. त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली होती. मात्र, सदर प्रकरण मिटवण्यात आल्याने तक्रार नोंदवण्यात आली नव्हती, असे आश्विनी शिरोडकर यांनी केरकर यांना सांगितले असून आपल्या नवर्‍याला कुणी तरी मारलेच आहे असा दावा केला आहे.