>> मुख्यमंत्र्यांचे मडगावातील सभेत प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिल्याने आपण राज्याचा विकास करू शकलो. त्यांच्या पाठिंब्यामुळे राज्यात विकासाची घोडदौड सुरू आहे. राज्य सरकार हे अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या त्रिसूत्रीचा अवलंब करून राज्यात विकासकार्य सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. मडगावातील कदंब बसस्थानकावर आयोजित ‘विकसित भारत, विकसित गोवा 2047′ अंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते.
केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत 30 हजार कोटी रुपये गोव्यातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दिल्याने राज्याचा विविध क्षेत्रात विकास झाला. तसेच हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधानांनी केले. गोवा विकसित करण्यात पंतप्रधानांनी राज्यातील भाजप सरकारला योग्य साथ दिली, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या सर्व योजनांची राज्यात प्रभावीपणे राज्य सरकारने अंमलबजावणी केली. क्लीन इंडिया, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, फिट इंडिया, इन्क्लुझिव्ह इंडिया या योजना सार्थपणे राबवल्या. पंतप्रधान विश्वकर्मा योजना, खेलो इंडिया, पर्पल फेस्ट ही त्याची काही उदाहरणे सांगता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातीला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सर्वांचे स्वागत केले. मठग्रामात पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आनंद वाटतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, माविन गुदिन्हो, विश्वजीत राणे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भाषणे झाली.
काल 11.30 पासून गोव्याच्या विविध तालुक्यांतून नागरिक सभास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली.
लोकांची ने-आण करण्यासाठी गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकातून बसेस भाड्याने आणल्या होत्या.
लोकांना जुन्या बाजारांतील वाहतूक बेटावर सोडण्यात येत होते. त्यानंतर 10 मिनिटांचे अंतर पार करत सभास्थळी जावे लागत होते.
चार ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती. अति महनिय व्यक्तीसाठी वेगळी व्यवस्था केली होती. पण अर्ध्या अधिक लोकांना जेवण मिळाले नसल्याच्या तक्रारी होत्या.
सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पत्रकारांना पोलिसांनी पेन, कागद नेण्यास बंदी घातली. पत्रकारांना वार्तांकनासाठी पेन व पेपर गरजेचे आहे, असे सांगूनही पोलिसांनी ताठर भूमिका घेतली. शेवटी पत्रकारांनी परत जाण्याची तंबी देताच काहींना पेन व कागद नेण्याची परवानगी दिली.
दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहरू स्टेडियमच्या सराव मैदानावर आगमन.
पंतप्रधान हॅलिकॉप्टरमधून उतरताच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व दिगंबर कामत यांच्याकडून स्वागत.
बुलेटप्रुफ वाहनातून मडगाव कदंब बसस्थानकावरील सभास्थानी आगमन.
सभामंडपात आल्यानंतर ‘विकसित भारत, विकसित गोवा’च्या दालनाला भेट देत पाहणी.
सभा मंचावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून पंतप्रधानांचा कुणबी शाल आणि पुष्पहार घालून सन्मान.
पंतप्रधानांकडून विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि काही प्रकल्पांची पायाभरणी.
पंतप्रधानांच्या हस्ते 1930 पात्र उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना रोजगार नियुक्तीपत्रांचे वाटप.
पंतप्रधान मोदींनी सभेच्यास्थळी विशेष मुलांचे अभिवादन आपुलकीने स्वीकारले.
कुमेरी शेती, वनहक्क सनदा, लाडली लक्ष्मी, दिव्यांग, दयानंद सामाजिक योजना, ग्रामीण विकास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप पंतप्रधानांहस्ते करण्यात आले.