राष्ट्रसमर्पित

0
28

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न ह्या देशातील सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या खऱ्या शिल्पकारास जणू सन्मानित केले आहे. अडवाणींनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेनेच देशाच्या राजकारणाला पालटले आणि अयोध्या विवाद राष्ट्रीय पातळीवर आणला. भारतीय जनता पक्षाला देशाच्या राजकारणात जे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आणि संसदेतील पक्षाची सदस्यसंख्या वाढत गेली, तीही अडवाणींच्या ह्या यात्रेमुळे. आज नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणुकांना समर्थपणे सामोरे जात असेल, तर ह्या देदीप्यमान यशस्वी कालखंडाचा पाया रचला गेला ते लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाच्या काळात हेही विसरून चालणार नाही. नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना गोध्रा घटनेवरून जी धार्मिक दंगल उसळली, त्यानंतर विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि स्वयंसेवी संघटना यांनी मोदींना लक्ष्य करण्यासाठी आकाशपाताळ एक केले होते. तेव्हा पंतप्रधानपदी असलेल्या अटलबिहारी वाजपेयींनाही मोदींना राजधर्माची आठवण करून द्यावीशी वाटली होती. मोदींना राजीनामा देणे भाग पडेल एवढे विरोधी वातावरण निर्माण झालेले असताना एक व्यक्ती ठामपणे मोदींच्या पाठीशी उभी राहिली होती ती होती लालकृष्ण अडवाणी. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही घटकांनाही मोदींनी राजीनामा द्यायला हवा असे वाटू लागले होते. अशावेळी मोदी यांना अन्यायकारकरीत्या लक्ष्य केले जात आहे अशी भूमिका अडवाणींनी घेतली. मोदींना बळीचा बकरा बनवले जाऊ नये असे त्यांचे मत होते. आपल्या स्मरणात असेल, त्याच काळात गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावण्यात आली होती. वाजपेयी आणि अडवाणी एकाच विमानातून गोव्याला निघाले होते. दोन तासांच्या ह्या प्रवासात गुजरातवर दोघांत चर्चा झाली. अडवाणींनी वाजपेयींचे मत आजमावले तेव्हा मोदी कमसे कम इस्तिफेका ऑफर तो करें असे वाजपेयी उत्तरले होते, असे अडवाणींनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले होते. नरेंद्रच्या राजीनाम्यामुळे गुजरातमधील परिस्थिती सुधारणार असेल तर आपण त्याला राजीनामा द्यायला सांगू असे त्यावर अडवाणींनी वाजपेयींना सांगितले व त्याप्रमाणे मोदींनी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना शेवटी आपल्या राज्यात जे घडले त्याची जबाबदारी स्वीकारून आपण राजीना द्यायला तयार असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांनी इस्तिफा मत दो अशी घोषणाबाजी केली. त्यामुळेच मोदींवर राजीनाम्याची वेळ तेव्हा आली नाही. पुढे 2014 च्या निवडणुकीत जुन्या जाणत्यांना घरी बसवण्याचा विषय मनोहर पर्रीकर यांनी आपल्या रॅन्सीड पिकल ह्या शेलक्या शेरेबाजीने ऐरणीवर आणला तेव्हाच मोदी यांची त्या निवडणुकीत भाजपचे प्रचारप्रमुख म्हणून घोषणा होऊ शकली व नंतर त्यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित झाले. मात्र, मोदी पंतप्रधान बनल्यानंतर लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी आदी ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळात ढकलले गेल्याने मोदींवर सतत टीका होत आली आहे. अयोध्येत नुकत्याच झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही त्या मंदिरासाठी ज्यांनी देशभरात वातावरणनिर्मिती केली ते अडवाणी कुठेच नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अडवाणींना भारतरत्न घोषित होणे हा रामबाण उपाय ठरला आहे. अडवाणींचे अवघे जीवन देशसमर्पित आहे ह्याविषयी शंका घेण्याचे काही कारण नाही. वाजपेयींची त्यांनी सावलीसारखी साथ दिली. पंतप्रधानपदास सर्वस्वी पात्र असूनही ती संधी त्यांच्याकडे शेवटपर्यंत आली नाही. केवळ उपपंतप्रधानपदावर समाधानी व्हावे लागले. परंतु काही व्यक्ती पद, पैसा, प्रसिद्धी याच्यापलीकडे गेलेल्या असतात. लालकृष्ण अडवाणी हे असेच सर्वांच्या आदरास पात्र ठरलेले नाव आहे. त्यांच्यावर हवालाकांडाचा कलंक ठेवण्याचा प्रयत्न झाला. बाबरी मशीद विद्ध्वंसास जबाबदार धरून त्यांना आरोपीही बनवण्यात आले. परंतु त्या साऱ्यातून निष्कलंकपणे ते बाहेर पडले. वाजपेयी आणि अडवाणी ही भाजपच्या हिंदुत्वाच्या विजयरथाची दोन चाके होती. वाजपेयींना यापूर्वीच भारतरत्न घोषित झाले होते. अडवाणी मात्र बाजूला फेकल्यागत झाले होते. 2015 साली त्याां पद्मविभूषण किताब दिला गेला, परंतु अवघे जीवन राष्ट्रार्पण केलेल्या ह्या सन्माननीय नेत्याचा त्याहून मोठा सन्मान व्हायला हवा अशी जनभावना होती. प्रणव मुखर्जी आणि कर्पुरी ठाकूरसारख्या भिन्न विचारधारेच्या व्यक्तींनाही हा सन्मान दिला गेला, मग अडवाणींना का नाही असा प्रश्न त्यांच्या समर्थकांस पडला होता. ही त्रुटी ह्या घोषणेने दूर केली आहे हे निश्चित!