कर्करोग इस्पितळ 16 महिन्यांत उभारणार

0
3

>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

>> गोमेकॉत स्तन कर्करोग रुग्णाला दिले पहिले मोफत इंजेक्शन

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सरकारी कर्करोग इस्पितळ येत्या 16 महिन्यांत उभे होणार आहे, असे काल जागतिक कर्करोग दिनी गोमेकॉमध्ये बोलताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. हे इस्पितळ टाटा मेमोरिएल इस्पितळाच्या सहयोगाने उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. टाटा मेमोरिएल इस्पितळाच्या व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार ह्या इस्पितळाच्या रचनेत बदल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णांना नवे व प्रभावी असे औषध देण्यासाठीच्या योजनेचा काल जागतिक कर्करोगदिनी गोमेकॉत शुभारंभ झाला. त्यावेळी बोलताना राणे यांनी वरील महिती दिली. दोन वेगवेगळ्या औषधांचे मिश्रण असलेले हे इंजेक्शन असून 4.20 लाख रु. एवढ्या किमतीचे आहे. काल रविवारी हे इंजेक्शन स्तनाचा कर्करोग झालेल्या एका रुग्णाला मोफत देण्यात आले.

स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना केमोथेरपीबरोबरच हे नवे औषध दिल्यास रुग्णांना त्याचा मोठा फायदा होत असल्याचे सिद्ध झाले असल्याचे राणे म्हणाले. स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार करण्याच्याबाबतीत गोवा वैद्यकीय महाविद्यालय गेल्या पाच वर्षांपासून आघाडीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्करोग रुग्णांच्या मांडीला इंजेक्शन देऊन त्याद्वारे हे औषध देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.

काल रविवारी 4 फेब्रुवारीपासून गोमेकॉत येणाऱ्या स्तनाचा कर्करोग झालेल्या रुग्णांना हे औषध देण्यात येणार असून स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झालेल्या नव्या रुग्णांना त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काल गोमेकॉत या उपचार पद्धतीचा शुभारंभ करताना डॉ. अनुपमा बोरकर यांनी, ही उपचार पद्धती खूप चांगली असून या उपचार पद्धतीमुळे रुग्ण लवकर बरा होण्याचे प्रमाणही वाढणार आहे. या नव्या उपचारामुळे उपचार पद्धतीचा कालावधीही कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही आधुनिक उपचार पद्धती गोमेकॉत येणाऱ्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगून रुग्णांना चांगले उपचार मिळविता यासाठी टाटा मेमोरिएल इस्पितळाशी हात मिळवणी करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गोवा पहिले राज्य

दोन औषधांचे मिश्रण असलेले नवे औषध गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने काल जागतिक कर्करोग दिनी स्तनांच्या कर्करोग रुग्णांना मोफत देणे सुरू केले अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. स्तनांच्या कर्करोग रुग्णांसाठी हे औषध वरदान ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करून अशा प्रकारे महागडे औषध रुग्णांना मोफत देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. गोमेकॉत दरवर्षी सुमारे 15 ते 20 रुग्णांना मोफत इंजेक्शन देण्याचे आरोग्य विभागाचे भविष्यातील धोरण असल्याचे राणे यांनी यावेळी अधिक माहिती देताना सांगितले.