स्वतःच्या 4 वर्षांच्या मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या बंगळूर येथील एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिच्या न्यायालयात कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ येथील बाल न्यायालयाने काल केली.
जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूचना सेठ हिच्या 4 वर्षांच्या मुलाच्या खुनाचे प्रकरण बरेच गाजले. या मुलाच्या खून प्रकरणी कळंगुट पोलिसांनी सूचना सेठ हिला अटक केली होती. अटक केल्यानंतर सूचना सेठ ही सुरुवातीला अकरा दिवस पोलीस कोठडीत होती; मात्र पोलीस कोठडीत तिने मुलाचा खून केल्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून मुलाच्या खून प्रकरणी तिच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. सूचना सेठ हिला गेल्या 19 जानेवारीला बाल न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तिची 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तिच्या न्यायालयीन कोठडीतील मुदत संपत आल्याने तिला पाटो पणजी येथील बाल न्यायालयासमोर काल हजर केले असता तिला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, सूचना सेठ हिच्या वडिलांनी न्यायालयात अर्ज करून तिची मानसिक आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली आहे. तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या अर्जावर पोलिसांनी आपले म्हणणे सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने
दिले आहेत.