Home Featured राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लांबला

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लांबला

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी प्रलंबित असून 31 जानेवारीपर्यंत याप्रकरणी निकाल देण्याचे आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते; परंतु काल सर्वोच्च न्यायालयाने विधासनभा अध्यक्षांना मुदतवाढ दिली.

जयंत पाटलांनी केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

30 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 जानेवारी 2024 पर्यंत घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते; परंतु मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला.

अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका जयंत पाटलांनी केली होती.