चोरटे कारमधून आले; 6 लाखांचा ऐवज लुटून गेले

0
4

>> साखळी शहरातील वामनेश्वर इमारतीत 2 फ्लॅट दिवसाढवळ्या फोडले; सुवर्णालंकारासह रोख रक्कम लंपास

साखळी शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वामनेश्वर या इमारतीत चोरट्यांनी दिवसाढवळ्या दोन फ्लॅट फोडून सुमारे 6 लाखांचा ऐवज लुटला. त्यात सोन्याचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे. एका चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी बिनधास्तपणे सदर इमारतीत घुसून 40 मिनिटांच्या आत दुसऱ्या व दुसऱ्या मजल्यावरील प्रत्येकी एक-एक फ्लॅट फोडला. या दोन्ही फ्लॅटमधून सुमारे 6 लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून, त्यात सुवर्णलंकार व रोख रकमेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी 11.30 ते 12.20 या दरम्यान सदर चोरीची घटना घडली. त्यावेळी दोन्ही फ्लॅट बंद होते. या प्रकरणी वामनेश्वर रेसिडेन्सी या इमारतीतील प्रेरणा प्रकाश पर्येकर यांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी पुढील लोखंडी गेट व दरवाजा तोडून प्रवेश केला व कपाटातील 1 सोनसाखळी, 2 अंगठ्या, 1 ब्रेसलेट, 3 कर्णफुलांचे जोड, 2 बांगड्या व 1 मंगळसूत्र असे सुमारे 4.50 लाखांचे सुवर्णलंकार व 28 हजार रोख रक्कम लंपास केली. सकाळी 11.30 ते दुपारी 12.20 या दरम्यान सदर संपूर्ण चोरीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रहाणाऱ्या विपल कुमार यांचाही फ्लॅट चोरट्यांनी लक्ष्य बनविला. दर्शनी दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला व आतील सुवर्णलंकार, रोख रक्कम व महागडी घड्याळे असा सुमारे 1.13 लाखांचा ऐवज लुटला.
वामनेश्वर रेसिडेन्सी या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या डिचोली अर्बन सहकारी बँकेच्या समोर सकाळी 11.30 च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली, त्यातून प्रथम दोघे जण खाली उतरले व ते जणू काही या इमारतीत नेहमीच ये-जा करत असतात याच अविर्भावाने थेट इमारतीत गेले. अवघ्या वेळाच्या अंतराने इमारतीत घुसलेले दोघेजण खाली आले. त्यांच्या मागोमाग तिसराही आला. अत्यंत घाईघाईने कारमध्ये बसले अन्‌‍ कारसह तेथून पसार झाले. सदर कारगाडी डिचोलीच्या दिशेने गेल्याचे समजते. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

कारचा क्रमांक मिळाला; पण बनावट
ज्या कारमधून चोरटे साखळीत आले होते, त्या कारचा क्रमांक काहींनी नोंद करून ठेवला होता आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कारचा क्रमांक दिसून आला होता. गाडीवरील सदर क्रमांकावरून पोलिसांनी तपासाला गती दिली. कारच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न केला असता सदर क्रमांकाची कार चोरी झालेल्या वेळी मूळ मालकाच्या घरीच होती असे आढळून आले. त्यामुळे सदर गाडीला बनावट क्रमांकपट्टी बसवून हा चोरीचा प्रकार घडला हे स्पष्ट झाले.