वनांवर आता ड्रोनद्वारे देखरेख : वनमंत्री राणे

0
12

राज्यातील वन्यजीव अभयारण्ये आणि संरक्षित क्षेत्रांवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. तसेच, 600 वन ट्रेकर्सना वनांतील आगीचे प्रकार रोखण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आल्तिनो येथे वन भवनात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली. वनांतील आगीच्या घटना, वन कायद्यांचे उल्लंघन आणि एकूण निरीक्षणासाठी 8 ते 10 ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. गेल्या वर्षी जंगलातील आगीमुळे सुमारे 76.5 हेक्टर जंगल नष्ट झाले होते. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच वन्यजीव अभयारण्ये आणि संरक्षित क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. मागील वर्षी वन विभागाकडून प्रशिक्षित केलेल्या 600 ट्रेकर्सना आग आणि इतर वन्यजीव आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वी रिफ्रेशर प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय आपदा मित्र आणि सख्यांची संख्या जी सध्या 350 वर आहे, ती आणखी वाढवली जाईल. जंगलात आग पसरू नये म्हणून फायरलाइन्स काढल्या जातील, असेही राणे यांनी सांगितले. आवश्यक खबरदारी न घेता परिसर साफ करण्यासाठी वनक्षेत्राला आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राणे यांनी दिला.