इंडिया आघाडीची दिल्लीत 19 रोजी चौथी बैठक

0
10

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख अखेर ठरली असून राजधानी दिल्लीत मंगळवार दि. 19 डिसेंबर रोजी ही बैठक होणार असल्याचे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर ही पहिलीच बैठक आहे.

नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यापूर्वीची बैठक मुंबईमध्ये झाली होती. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपने तीन राज्यात सत्ता मिळवली, तर काँग्रेसने एक राज्य काबीज केले. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती आणि जागावाटपाबाबत चर्चा होऊ शकते. आघाडीतील अनेक पक्ष जागावाटपाबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आघाडीत काँग्रेसला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ही बैठक आता महत्त्वाची ठरणार आहे. सध्या इंडिया आघाडीमध्ये बरेच वाद सुरू असल्याचेदिसून येत आहे. त्यामुळे विरोधकांच्या या युतीमध्ये सध्या बराच तणाव आल्याच पाहायला मिळत आहे. त्याचवेळी काँग्रेसेचे नेते जयराम रमेश यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांनी इंडिया आघाडीत सामील असलेल्या पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक मंगळवारदि 19 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुपारी 3 वाजल्यापासून होणार असल्याचे म्हटले आहे.

जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता
या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त निवडणूक प्रचाराबाबतही बैठकीत चर्चा होऊ शकते.

6 रोजी होणार होती बैठक
यापूर्वी ही बैठक 6 डिसेंबरला होणार होती. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्वनिर्धारित तारखेला बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली होती. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही राज्यात चक्रीवादळ मिचॉन्गचे व्यवस्थापन करत असल्यामुळे उपस्थितीबाबत अनिश्चितता दर्शवली होती.

सप्टेंबरमध्ये शेवटची बैठक
27 पक्षांच्या आघाडीची शेवटची बैठक सप्टेंबरमध्ये मुंबईत झाली होती, ज्यामध्ये समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे यांनी केले होते. आघाडीत सामील असलेल्या पक्षांमधील जागावाटपाची चर्चा रखडली होती.