सत्ताधारी, घटक पक्ष-अपक्षांचे कोविंद यांनाच मतदान

0
86

>> आमदार नीलेश काब्राल यांची माहिती

राष्ट्रपतीपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत गोवा विधानसभेतील ३८ आमदार, तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून मतदान केले. मगो, गोवा फॉरवर्ड, अपक्ष या सर्व सरकारचे घटक असलेल्यांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याच बाजूने मतदान केल्याचे प्रदेश भाजप प्रवक्ते तथा कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले.
येत्या दि. २१ रोजी होणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकीतही भाजप उमेदवार विनय तेंडुलकर यांनाच सर्व घटक पक्ष मतदान करतील, असा विश्‍वास काब्राल यांनी व्यक्त केला. केंद्रातील सरकारने गोवा राज्यासाठी काहीही कमी केलेले नाही. अनेक योजना मंजूर केल्या आहेत. पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्राने चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत.
आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी सांगे मतदारसंघात ९ लाख चौरस मीटर जागा शोधल्याचे सांगून जिल्हाधिकारी व अन्य संबंधितांनी जमिनीची तपासणीही केल्याचे काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. काणकोण येथे विरोध झाल्याने वरील प्रकल्प सांगेत आणण्याचे ठरविले आहे. निश्‍चित केलेल्या ठिकाणी काही प्रमाणात खाजगी जमीन आहे. परंतु अडचण नाही, असे ते म्हणाले.

राष्ट्रपतीपदासाठी ९९ टक्के मतदान
नवी दिल्ली ः राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विविध राज्यांत मिळून जवळजवळ ९९ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनुप मिश्रा यांनी दिली. ही टक्केवारी कदाचित आतापर्यंतची सर्वोच्च असावी. देशातील ९-१० राज्यांमध्ये १०० टक्के मतदान झाले असल्याचेही मिश्रा म्हणाले. दिल्लीत संसदेत काल ७१४ खासदारांनी मतदान केल्याचे मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ पैकी ४०२ आमदारांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे आमदार शिवपाल यादव यांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केले. याआधीच्या सरकारात मंत्री असलेल्या शिवपाल यादव यांनी आपण कोविंद यांना मतदान केल्याचे स्वतः पत्रकारांना सांगितले.