>> एक बालिकाही मृत्यूमुखी
जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेनजीकच्या पूँछ व राजौरी जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या छावण्या व नागरी वस्त्यांवर काल पाक सैनिकांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये भारताचा महमद मुदस्सर हा जवान शहीद झाला. तसेच एक ७ वर्षीय मुलगी ठार झाली असून काही नागरिकही जखमी झाले. या हल्ल्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे लष्करी प्रवक्त्याने सांगितले.
या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार मुदस्सर असलेल्या खंदकावर पाक सैनिकांनी उखळी तोफांचा भडीमार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला इस्पितळात नेल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. ३७ वर्षीय मुदस्सर याच्या पश्चात पत्नी शाहीन व दोन मुले आहेत.
पाक सैनिकांनी लष्करी छावण्यांबरोबरच बालाकोट, मंजाकोट व बारोटी या भागांमधील नागरी वस्त्यांवरही उखळी तोफा डागल्या. त्यात ९ वर्षीय साजदा हौसर ही बारोटी येथील मुलगी ठार झाली. तर मांजाकोट येथे दोन नागरिकांसह एक जवानही जखमी झाला.
या हल्ल्यांमुळे बालाकोट व मंजाकोट येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.