काँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाने निवडणुकपूर्व युती केली होती. ही युती अद्याप अबाधित आहे असा खुलासा गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केला. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर ही युती झाली होती. लोकसभा निवडणुकीस आता अवघे सहा महिने शिल्लक राहिलेले असून काँग्रेसने आताच उमेदवार जाहीर केल्यास सर्व विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करणे सोपे होणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. येत्या लोकसभा निवडणुकीत जर काँग्रेस पक्षाला विजय मिळवायचा असेल तर पक्षाने विनाविलंब उत्तर व दक्षिण गोव्यासाठी आपला उमेदवार निवडून प्रचाराचे काम हाती घ्यायला हवे. त्यासाठी पक्षाने समविचारी पक्ष व नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करायला हवी, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने याकामी विलंब केल्यास पक्षाचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अन्य पक्षांतून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांबरोबर त्या त्या मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते नाहीत, असा दावाही सरदेसाई यांनी केला आहे