इस्त्रोच्या गगनयानची उद्या उड्डाण चाचणी

0
22

चाचणीचे अबॉर्ट टेस्ट नामकरण

चाचणीत अंतराळवीरांची सुरक्षितता तपासणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी उद्या शनिवार 21 ऑक्टोबर रोजी करणार आहेत, इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेले जाईल. यासह ते पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाणार आहे.
इस्रोने या उड्डाण चाचणीचे अबॉर्ट टेस्ट असे नामकरण करण्यात आले आहे.

गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे. चाचणी दरम्यान गगनयानचे मॉड्यूल अंतराळात ठराविक उंचीपर्यंत नेऊन मॉड्यूलने ठराविक उंची गाठल्यानंतर ते पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाणार आहे.
इस्त्रोने मिशन गगनयानबाबत माहिती देताना, गगनयान मोहिमेतील चाचणी उड्डाण उद्या शनिवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान श्रीहरिकोटा येथून होणार आहे.

मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या गगनयान मोहिमेची आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी हे गगनयानच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि देशाच्या अंतराळ संशोधन महत्वाकांक्षेचा भविष्यातील मार्ग तयार करण्यासाठी आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीत भारताच्या अंतराळ प्रयत्नांच्या महत्त्वपूर्ण विकासाचा आढावा घेण्यात आला. भारतीय अंतराळ विभागाने गगनयान मोहिमेचा सर्वसमावेशक अहवाल आणि योजना सादर केली. इस्रोने गगनयान मोहिमेमध्ये मानवी रेटेड लॉन्च व्हेइकलच्या 3 अनक्रियूड मोहिमांसह सुमारे 20 प्रमुख चाचण्या नियोजित केल्या आहेत. क्रू एस्केप सिस्टम चाचणी वाहनाची पहिली प्रात्यक्षिक उड्डाण 21 ऑक्टोबरला होणार आहे.

या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी गगनयान मोहिमेचा आढावा घेतला आणि इस्रोसह मिळून महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, 2025 पर्यंत भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहचतील, तर 2035 अंतराळ स्थानकावर जातील, त्यानंतर 2040 पर्यंत मानवी चंद्र मोहिम हे भारताचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.

पहिली मानवी अंतराळ मोहीम
गगनयान मोहीम ही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहीमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचे प्रशिक्षणही सुरू आहे. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी पहिले रोबोट तयार केले जात आहेत. आधी रोबोटिक चाचणी होईल त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल.