>> भाजपच्या अवयदान जागृती कार्यक्रमात आवाहन
अवयव दान ही काळाची गरज आहे. अवयव दानातून आजारी व्यक्तींना नवीन जीवनदान देऊ शकतो. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अवयवदानाबाबत जनजागृतीवर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वैद्यकीय विभागाने अवयव दानाबाबत जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे. जिल्हा, तालुका, मतदारसंघातून अवयव दानाबाबत जनजागृती करावी. नागरिकांनी अवयव दानासाठी स्वेच्छेने पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भाजप मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. शेखर साळकर, डॉ. स्नेहा भागवत यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपच्या अवयव दान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
गोमेकॉमध्ये आत्तापर्यंत चार ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवाचे दान यशस्वी करण्यात आले आहे. अवयव दानासाठी मृताच्या कुटुंबीयाची संमती आवश्यक आहे. गोमेकॉकडून अवयव दानाच्या जागृतीसाठी काम केले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
मूत्रपिंड प्रत्यारोपणास चालना देणार
राज्यातील मूत्रपिंड रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाला आणखी चालना दिली जाणार असून मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) आणि वैद्यकीय उपचार योजनेखाली आणण्यात येणार आहे. तसेच, राज्यात आणखी मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू केली जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच, गोमेकॉमधील नेत्रपेढी पुन्हा सुरू केली जाणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
अवयव दानाचा संकल्प
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते भाजपच्या वैद्यकीय विभागाच्या अवयव दान जागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नोटोच्या संकेत स्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून मरणोत्तर मूत्रपिंड, यकृत आणि डोळ्याची कोर्निया दान करण्याचा संकल्प केला आहे. तसेच, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी ऑनलाइन नोंदणी करून अवयव दानाचा संकल्प केला आहे.