कावेरी पाणी प्रश्नावरून आज कर्नाटक बंद

0
8

>> राज्यातील शाळा, महाविद्यालयांवर परिणाम होण्याची शक्यता

कावेरी पाणीप्रश्नावरून कर्नाटकात आज शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे राज्यातील शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांवर परिणाम होणार असून तीही बंद राहतील.

आज कर्नाटक बंदचे आवाहन कन्नड़ चालुवली समूहाच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आले आहे. तामिळनाडूला कावेरी नदीचे पाणी सोडण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. कर्नाटकातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या असोसिएटेड मॅनेजमेंटने आजच्या कर्नाटक बंदला पाठिंबा व्यक्त केला आहे. कन्नड कार्यकर्ते नागराज यांच्या नेतृत्वाखाली ‘कन्नड ओक्कुटा’ या बॅनरखाली आजचा राज्यव्यापी बंद होणार आहे.

ओला, उबर सेवाही बंद
तामिळनाडूला कावेरी नदीचे पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात कर्नाटकमधील ओला व उबर कॅबसेवा असून त्यांनीही आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे संपूर्ण कर्नाटकात ओला व उबर सेवा ठप्प राहतील. त्यामुळे या कॅबसेवेचा लाभ घेत असलेल्या असंख्य नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे राज्यातील शेक्षणिक संस्थांही बंद ठेवण्यात येणार आहेत.
मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी बंगळुरु बंदची हाक शेतकरी नेते कुरुबुरु शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी दिली होती. त्याला कित्येक संघटनांनी प्रतिसाद देत बंदला पाठिंबा दिला होता. आजच्या बंदला प्रतिसाद देत बंगळुरुमधील सर्व खासगी शाळाही आज बंद राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंद हा शांततापूर्ण असावा, बंदमुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये असे आवाहन करताना पुढच्या वेळी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर येईल तेव्हा सरकार या मुद्द्यावर आपली बाजू मांडेल असे आश्वासन दिले आहे.
कावरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक व तामिळनाडू यांच्यात कित्येक वर्षे संघर्ष सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी कावेरी जल प्रबंधन प्राधिकरणने कर्नाटक सरकारला येत्या 15 दिवसांत तामिळनाडूला 5 हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही न्यायालयाने त्यांना सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळे आता कर्नाटकात बंदचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात आंदोलने सुरुच
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी, पोलीस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. म्हैसूर, मंड्या, चामराजनगर, रामनगरा, बंगळुरू आणि राज्याच्या इतर भागात कावेरी नदी खोऱ्यात शेतकरी संघटना आणि समर्थक कन्नड संघटनांनी निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला. आंदोलकांनी राज्य सरकारला शेजारच्या राज्याला पाणी न सोडण्याची विनंती केली आहे. कर्नाटकचे म्हणणे आहे की, ते कावेरी नदी खोऱ्यातील उभ्या पिकांसाठी सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडण्याच्या स्थितीत नाही कारण कमी पावसामुळे पाण्याची कमतरता आहे.

195 तालुक्यांमध्ये दुष्काळ
तामिळनाडूला पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत रविवारी मंड्यामध्ये विविध संघटनांनी बंद पाळला होता. कर्नाटक सरकारने राज्यात पाऊस नसल्याचे कारण देत कावेरीचे पाणी सोडण्यास असमर्थता व्यक्त केली होती. सिद्धरामय्या यांनी ऑगस्टमध्ये राज्यात 73 टक्के कमी पाऊस झाल्याचे सांगितले होते. राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी 195 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अंतर्गत केंद्राकडून नुकसानभरपाई मागण्याचा प्रस्ताव मान्य केला. कर्नाटकात सरकारने 161 तालुके गंभीर दुष्काळाचा सामना करत आहेत आणि 34 तालुके मध्यम दुष्काळाचा सामना करत असल्याचे म्हटले आहे.