प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षात अनेक नेते इच्छुक
सत्ताधारी भाजपमध्ये सध्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर निवड झाल्यापासून ते पद रिक्त आहे आणि या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी पक्षातील इच्छुक नेते प्रयत्नरत आहेत.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत, केपे मतदारसंघाचे माजी आमदार बाबू कवळेकर, दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांची नावे चर्चेत आहेत. त्याशिवाय पक्षाचे माजी आमदार व माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हेही या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, तसे असले तरी इच्छुकांपैकी ह्या मतदारसंघातून कुणाला लोकांचा जास्त पाठिंबा आहे हे जाणून घेण्यासाठी पक्षाची संसदीय समिती त्यासाठीची सर्वे केल्यानंतरच उमेदवाराची निवड करणार असल्याचे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या वेळी भाजपचा ह्या मतदारसंघातून निसटता पराभव झाला होता. त्यामुळे भाजपने देशभरातून निसटता पराभव झालेल्या आपल्या 100 मतदारसंघांमध्ये दक्षिण गोवा मतदारसंघाचा समावेश केलेला आहे. ह्या 100 मतदारसंघांवर ह्यावेळी पक्ष विशेष लक्ष केंद्रीत करून तेथे विजय मिळवू पाहत आहे. त्यामुळे ह्या शंभर मतदारसंघातील एक मतदारसंघ असलेल्या दक्षिण गोव्याकडे भाजपचे खास लक्ष आहे. त्यादृष्टीने मोठा जनाधार असलेल्या अशाच उमेदवाराची या मतदारसंघासाठी निवड करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ह्या मतदारसंघात उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे पक्षाच्या संसदीय समितीने केलेल्या सर्वेनंतरच स्पष्ट होणार असल्याचे या नेत्याने नमूद केले.
प्रदेशाध्यक्षपदासाठी दयानंद सोपटे, दामू नाईक यांच्याबरोबरच दक्षिण गोवा मतदारसंघासाठीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले दोन नेतेही प्रयत्नरत आहेत. दक्षिण गोव्यासाठीची उमेदवारी न मिळाल्यास निदान प्रदेशाध्यक्षपद तरी मिळावे यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.