लांच्छनास्पद

0
145

आपल्या संपन्नतेचा आणि सुसंस्कृततेचा सदोदित टेंभा मिरवणार्‍या गोवेकरांना लाजेने खाली मान घालायला लावणार्‍या दोन घटना गेल्या दोन दिवसांत गोव्यात घडल्या. मेरशीच्या एका प्रतिष्ठित राजकारणी कुटुंबाने आपल्या सुनेचा हुंड्यासाठी छळ चालवल्याचे बिंग सदर पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतल्याने फुटले आणि दुसरीकडे कांदोळी येथे आपल्या सख्ख्या बहिणीलाच तब्बल पंधरा वर्षे गलीच्छ, अंधार्‍या खोलीत डांबून ठेवणार्‍या दोघा नराधमांच्या पापाचा घडा भरला. या दोन्ही घटना गोमंतकीय समाजमानसाला सुन्न करून गेल्या आहेत. राजकारणापासून समाजकारणापर्यंत प्रतिष्ठेचे बुरखे पांघरून आजवर वावरत आलेल्या एखाद्या कुटुंबामध्ये सुनेचा हुंड्यासाठी छळ होणे, तिला मारबडव होणे हे खरे असेल तर लांच्छनास्पद आहे. राज्यात भाजपाचे सरकार असूनही संबंधित पदाधिकार्‍याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला ही बाब दिलासादायक असली, तरी वकिली कौशल्य वापरून वा राजकीय अथवा आर्थिक दडपणाद्वारे या प्रकरणावर पडदा तर टाकला जाणार नाही ना अशी शंकाही व्यक्त होताना दिसते आहे. कोणतीही आई आपल्या मुलीचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करणारे पाऊल काही कारण नसताना उचलणार नाही. त्यामुळे ‘हे घरगुती प्रकरण आहे आणि दोन चार दिवसांत मिटेल’ असे म्हणून त्यावर पडदा ओढण्याची जी काही घाई चालली आहे, त्यातून तक्रारीचे गांभीर्य तीळमात्र कमी होत नाही. यासंदर्भात तत्परतेने तपास झाला पाहिजे आणि खरोखरीच छळणूक झालेली असेल तर संबंधिताच्या पदाचा वा प्रतिष्ठेचा कोणताही मुलाहिजा न राखता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. कांदोळी येथील दुसर्‍या प्रकरणात तर जे काही समोर आले ते अतिशय विषण्ण करणारे आहे. गोव्यासारख्या पुढारलेल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे काही घडले असेल यावर विश्वास बसत नाही एवढे भयावह हे एकंदर कृत्य आहे. आजवर देशाच्या इतर भागांत अशा प्रकारे एखाद्याला जिवंतपणी मरणयातना भोगायला लावल्या गेल्याच्या वा स्वतःहून कोंडून घेतल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या, परंतु सुसंस्कृत गोव्यामध्ये कांदोळीसारख्या गावामध्ये असे काही घडत असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. ज्या व्यक्तीने सामाजिक संघटनेशी संपर्क साधून या प्रकाराला वाचा फोडली ती प्रशंसेस पात्र आहे. एक फार मोठे सामाजिक कर्तव्य त्या व्यक्तीने पार पाडले आणि सदर स्वयंसेवी संघटनेनेही तत्परतेने त्या दुर्दैवी महिलेची सुटका केली. केवळ वैवाहिक आयुष्य अपयशी ठरले म्हणून आपल्याच सख्ख्या बहिणीला अशा नरकयातना देणार्‍या या दोघा भावांना नराधम नाही तर दुसरे काय म्हणावे? आपल्या या अत्यंत घृणास्पद कृत्याची या महाभागांना लाज वाटायला हवी. आज जग कुठे चालले आहे! वैवाहिक जीवन अपयशी ठरल्याने आपल्या बहिणीला मानसिक धक्का बसला असेल, मनावर परिणाम झाला असेल तर समुपदेशनापासून मानसोपचारापर्यंत तिला त्या अंधारातून बाहेर काढण्याच्या सार्‍या सोयीसुविधा गोव्यामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असताना या दोघा बंधूंनी तिला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावल्या हे आकलनापलीकडचे आहे. त्यांच्या नातेवाईकांनाही या प्रकाराची कल्पना नसावी हे तर आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. सदर महिलेची रवानगी आता प्रोव्हेदोरियाच्या आधाराश्रमात करण्यात आलेली आहे. एवढा प्रदीर्घ काळ असे तुरुंगवत जिणे नशिबी आल्याने ग्रासलेल्या व्याधींतून ती बाहेर यावी, तिच्या मानसिक स्थितीमध्ये सुधारणा घडावी आणि पुन्हा जीवनानंद निर्माण व्हावा यासाठी आवश्यक प्रयत्न आता झाले पाहिजेत. गोव्याच्या भाळी आलेले हे लांच्छन जेवढेे लवकर पुसले जाईल तेवढे बरे!