…. कधी होशील माणूस?

0
1114

– अनुराधा गानू

आजचा माणूस या शोधाचा वापर करून सगळं जगच उध्वस्थ करायला निघालाय. म्हणजे प्रगतीची, विज्ञानाची वाट समोर दिसत असून सुद्धा माणसाची पावलं मात्र विनाशाकडे वळताहेत. म्हणूनच भीति वाटतेय की मनुष्य पुन्हा आपल्या मूळपदावर तर परत जात नाहीये ना?

डार्वीनच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचा पूर्वज माकड. बरोबर ना! त्याच्या पुढची स्थिती म्हणजे आदीमानव! हा जंगलात राहणारा, कंदमुळे खाणारा, प्राण्यांची शिकार करून खाणारा. हे त्याचं रूप. माकडाचा माणूस होताना उत्क्रांतिवादाच्या तत्त्वाप्रमाणे निरुपयोगी असलेली इंद्रिये गळून पडली. जंगलात राहणार्‍या थंडी-वार्‍यापासून रक्षण व्हावे म्हणून नियतीने त्याला भरपूर केस दिले. जलद धावता यावं म्हणून हे चार पाय. फटकारण्यासाठी शेपूट दिली असावी. आता माकडाच्या अंगावरचे केस गळून पडले. शेपूट गळून पडली. माकडं दोन पायांवर चालू लागली आणि दुसर्‍या दोन पायांचा उपयोग काम करण्यासाठी हात म्हणून करू लागली. मग नियतीने त्याला विचारशक्ती दिली आणि आजचा माणूस स्वतःला माकड म्हणवून न घेता माणूस म्हणवून घेऊ लागला. पण खरं तर माकडाचा माणूस झालाच नाही. माकडाला जसं प्राणी म्हणून ओळखलं जातं तसं माणसालाही मनुष्यप्राणी म्हणूनच ओळखलं जातं. प्राण्यांचे गुण उत्क्रांतीनंतरही माणसामध्ये तसेच राहिलेत. सगळ्या सजीवांमध्ये माणसाला विचार करायची ताकद नियतीने सर्वांत जास्त दिली खरी पण ती कशी वापरायची हे ज्ञान मात्र त्याला झालंच नाही, आणि ‘‘अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस…’’ हा प्रश्‍न विचारायची वेळ आलीय.
माकड-उड्या तर माणूस सततच मारत असतो. माकड-उड्या मारणारे कोण? लहान मुलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. लहान मुलं मारतात त्या बेडूक उड्या आणि मोठी माणसं मारतात त्या माकड-उड्या. आपले नेते नाही का या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत! एका पक्षातून दुसर्‍या पक्षात ते कधी जातात ते कळतंच नाही. माकडं कशी एका झाडावरून पटकन् दुसर्‍या झाडावर कधी उडी मारतात ते कळतही नाही. तसंच काही काही जाहिरातींत नाही का आपले नटनट्या छोट्या छोट्या चड्‌ड्या घालून वेड्या-वाकड्या उड्या मारतात, तेव्हा मला तर बाबा आपल्या पूर्वजांची आठवण झाल्याशिवाय राहातच नाही.
माकडाचा माणूस होताना उपयोग नसलेली इंद्रिये गळून पडली. नाहीशी झाली. आज आपल्याला दिसतात ती माणसाची सुधारित इंद्रिये, सुधारित मेंदू. मग प्रश्न असा पडतो की या सुधारित मेंदूचा उपयोग, सुधारित इंद्रियांचा उपयोग माणूस खरंच चांगल्या कामासाठी करतोय का? मग भीति अशी वाटते की जर हे असंच होत राहिलं तर मग आपले निरुपयोगी अवयव, आपला निरुपयोगी मेंदू नाहीसा तर नाही ना होणार? आणि आपण पुन्हा आपल्या मूळ पदावर तर जाणार नाही ना! विचारशक्ती कशी वापरायची हे ज्ञानच माणसाला मिळालेलं नाही. अजूनही तो जंगलातल्या पशूसारखाच अविचाराने वागतो आहे. आज अत्याचाराच्या, बलात्काराच्या, खूनाच्या इतक्या असंख्य घटना घडताहेत. ही कृत्ये करणारी माणसं विचारशक्तीचा उपयोग करताना दिसतात का कुठे? कसलाही विचार न करता माणसं एकमेकांवर प्राणघातक हल्ले करतात. दिवसा-ढवळ्या, भर वस्तीत, चालत्या बसमध्ये स्त्रियांवर बलात्कार केला जातोय. भर रस्त्यावर एकमेकांचे खून पाडले जाताहेत, लोकांना दिसतंय पण कोणीच काही करू शकत नाही.
जसं जंगलात एखादा हिंस्त्र पशू दुसर्‍या प्राण्यावर किंवा एखाद्या गरीब हरणांच्या कळपावर हल्ला करतो, त्या कळपातील एखाद्या हरणाचा बळी जातो आणि बाकीची हरणं जिवाच्या आकांताने घाबरून पळून जातात. अशीच पशुतूल्य माणसे दुर्बल माणसांवर अचानक हल्ला करतात. काही माणसांचे त्यात बळी जातात. उरलेली माणसे घाबरून पळून जातात. (सगळं जीवनच इतकं असुरक्षित झालंय की वाटतं माकडाप्रमाणे अजूनही चार पाय असते आपल्याला तर आपण जास्त जोरात पळू शकलो असतो कदाचित आणि हल्ल्यांपासून वाचलो असतो.)
हे तर जंगलराजच झालं. नाही… आपण त्याच्याही पुढे गेलोय. जंगलात एका प्राण्याने केलेल्या सावजावर दुसरा प्राणी तुटून पडत नाही. पण आपण माणसं एका माणसाने बलात्कार केलेल्या स्त्रीवर अनेक जण तुटून पडतोय.
आदीमानव, म्हणजे पूर्वीचे आपणच. सुरक्षिततेसाठी टोळ्या करून राहात होतो. टोळ्या-टोळ्यांमध्ये युद्ध होतं. आज प्रत्येक देशच एक टोळी बनलाय आणि शेजार शेजारच्या टोळ्यांमध्ये युद्ध चालूच आहेत. पूर्वी धातूशास्त्राचे नवीन नवीन शोध लागले नव्हते तेव्हा दगड हेच दुसर्‍या टोळीतील मानवाना मारण्याचं हत्यार होतं. अजूनही खून करण्यासाठी कोठे कोठे दगडाचा वापर होतोच आहे.
अजूनही आपण माकडाच्या शिकवणीप्रमाणे वागत आहोत. डोळे बंद. म्हणजे जगात घडत असलेल्या वाईट घटना आपल्याला दिसत नाहीत. कान बंद केले की लोकांच्या, पीडितांच्या किंकाळ्या आपल्याला ऐकू येत नाहीत. तोंडावर हात ठेवल्यामुळे आपण बोलू शकत नाही, पण न बोलता दुसर्‍याच्या पाठीत खंजीर खुपसतोच ना! डोळे बंद, कान बंद, तोंड बंद म्हणजे या इंद्रियांना काही कामच नाही. आपले हात तरी आपण चांगल्या कामासाठी कुठे वापरतोय? खून-मारामार्‍या यातच आपले हात अडकून पडलेत. एखाद्या चांगल्या कामासाठी, दुर्बलांच्या मदतीसाठी आपले पाय कुठे धावून जाताहेत! आपला मेंदू, आपली बुद्धी दुसर्‍याचं वाईट कसं होईल यातच त्याचा वापर आपण करतोय. आपला मेंदू व्यसनातच अडकलाय. मग ही सगळी आपली इंद्रिये गळून पडतील कां हो?
आपण जेव्हा माकडं होतो ना, तेव्हा आपल्याला कपड्याची माहिती नव्हती. त्यानंतरची अवस्था आदीमानवाची. त्याही अवस्थेत कपडे घालणे हे माहीत नव्हतंच. मग एका मानवाला कापूस कळला. मग कापसापासून धागा आणि धाग्यापासून कापडाचा शोध लागला. मग शिवणकला अवगत झाली आणि आदीमानवासारखी वल्कलं न घालता आपण कपडे घालू लागलो. कपड्यांच्या नवीन नवीन फॅशन्स येत गेल्या. पण काळ जसजसा पुढे सरकतोय तस तसे कपडे पायाकडून वर वर येतायत् आणि खांद्यापासून खाली खाली जातायत्. एक दिवस त्या आदीमानवाच्या वल्कलांसारखी कमरेभोवतीची एक पट्टीच शिल्लक राहील आणि माणसं ती फॅशन म्हणून मिरवतील. असं झालं तर आश्चर्य वाटायला नको.
नियतीने माणसाला प्रजनन शक्ती दिली. खरं म्हणजे केवढं मोठं वरदान त्यानं माणसाला दिलंय. पण त्या वरदानाचं माणसानं स्वतःच्या हातानं शापामध्ये रुपांतर केलंय. माणसानं आपली प्रजा अतोनात वाढवली आणि आज जगावर येणार्‍या प्रत्येक संकटाचं उत्तर शेवटी लोकसंख्येवर येऊन थांबतं. त्यामुळे माणसाचा हावरेपणा वाढला. सगळं स्वतःसाठी ओरबाडून घ्यायची वृत्ती वाढली. आपल्या सात पिढ्यांना पुरेल एवढा संपत्ती संचय करण्याच्या लालसेपायी माणूस किती खालच्या थराला जाऊन पोहोचला!
भ्रष्टाचाराचं पीक वाढलं. पैसा आला. व्यसनं वाढली आणि माणसातला पशू जागा झाला. माणूस पशुतूल्य वागू लागला. आता तर माणसानं स्वतःच्या स्वार्थापायी निसर्गालाही ओरबाडायला सुरवात केलीय. जंगलं, वृक्ष, झुडुपं, वेली सगळंच तोडायला निघालाय. आपल्या धरती मातेलाच उध्वस्थ करायला निघालाय. पण जसजसा त्यात तो गुंतत जाईल तसतसा तो स्वतःच उध्वस्थ होईल हे त्याला कळतंच नाहीये. जंगलांची, झाडांची कत्तल करून स्वतःच्या जगण्यासाठी लागणारा प्राणवायू तो संपवायला निघालाय आणि नवीन कॉंक्रीटचं जंगल निर्माण करू पाहतोय.. जिथं त्याचा श्‍वास घुसमटतोय.
विज्ञानाला हाताशी धरून नवीन नवीन शोध लावतोय पण त्याचा उपयोग त्याला जगाच्या भल्यासाठी करता येत नाहीये. धातू शास्त्राचा शोध लागला. त्यामुळे शेतीची नवीन अवजारे बनवता आली. या शोधाचा उपयोग शेतीसाठी करता करता त्यानं तलवारी, सुरे, बंदुका बनवायला सुरुवात केली आणि त्याचा उपयोग दुसर्‍याचे प्राण घेण्यासाठी करू लागला. बोटीचा शोध लागला. त्या बोटीचाच उपयोग माणूस दुसर्‍यावर हल्ले करण्यासाठी करू लागला. फार मोठे शास्त्रज्ञ सर थॉमस यांनी अणूचा शोध लावला. याचा उपयोग कोणत्याही संहारासाठी करायचा नाही असं त्यांनी म्हटलं होतं. पण आजचा माणूस या शोधाचा वापर करून सगळं जगच उध्वस्थ करायला निघालाय. म्हणजे प्रगतीची, विज्ञानाची वाट समोर दिसत असून सुद्धा माणसाची पावलं मात्र विनाशाकडे वळताहेत. म्हणूनच भीति वाटतेय की मनुष्य पुन्हा आपल्या मूळपदावर तर परत जात नाहीये ना?
कारण माणसातला माणूस अजून जागाच होत नाहीयेय. म्हणून सांगावसं वाटतं – ‘माणसा संपूर्ण विनाश होण्याआधी तरी जागा हो!
अरे माणसा माणसा | विसर पशू माणसातला |
विस्फोट होण्याआधी | शोध माणूस माणसातला ॥