- पौर्णिमा केरकर
जे दुर्मीळ असते त्याची ओढ नेहमीच मनाला लागते, पण त्याचबरोबर ते टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आज ज्या वेगाने आधुनिकतेच्या नावावर जंगलांचा विद्ध्वंस होत आहे ते पाहता अळंब्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या राखून ठेवल्या तरच त्याची चव आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी टिकेल.
बरीच वर्षे लोटली त्या प्रसंगाला; पण अजूनही मनावर तो क्षण कोरला गेलेला आहे. अळंबी ही खायची असतात. त्यांची चव आगळीवेगळी असते. विशिष्ट ऋतूत ठराविक कालावधीत आणि पोषक अशा हवामानातच त्यांचे उत्पादन नैसर्गिक स्वरूपात अनुभवता येते. ती खूप दुर्मीळ आणि म्हणूनच तिची चव चाखण्याची ऊर्मी अनिवार अशीच असते. हे आणि असेच कितीतरी अळंब्यांविषयी ऐकलेले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र ती खाण्याचा योग कधी जुळून आला नव्हता. ती चव पहिल्यांदा चाखली ती सत्तरीतील सुर्ला या समुद्रसपाटीपासून आठशे मीटर उंच असलेल्या गावात.गर्द हिरव्या रंगाची पार्श्वभूमी जशी या गावाला लाभलेली तसेच पावसाळ्यात येथील झरे-वझरे उत्स्फूर्त आवेगाने येऊन धरित्रीला जेव्हा भिडतात तेव्हा डोळ्यांचे पारणे फिटते.
धो-धो कोसळणाऱ्या पावसात चोरला घाटातून कडेकपारीमधून फेसाळणारे धबधबे बघत बघत सुर्लाची सफर करणे हा पंचवीस वर्षांपूर्वीच्या काळातील जणू एक नियमच बनला होता. डोंगरकपारीत वसलेला हा छोटासा गाव गच्च कौलारू घरांचा. पावसात तर तिन्हीसांज व्हायच्या आतच काळोखात गुडूप झालेला असायचा. परंतु एक घर मात्र आमच्यासाठी सदैव जागे राहायचे. रात्री-अपरात्री, थंडी-पावसात… या घराने जी मायेची ऊब दिली ती आजही जाणवते. विजय गावकरचे हे घर. विजयची आई आणि बाबा हे या घराचे खांब. या उभयतांनी आल्या-गेल्यांना घट्ट बांधून ठेवले होते. वर्षे उलटली.
सर्वांच्याच वाटा विलग झाल्यापूर्वीचा गाव… ती छोटी-छोटी कौलारू घरे, सदासर्वकाळ घरात रमरमत राहणारा ‘परसो’, चूल, चुलीवरचा उतव… आणि तिथं शेजारीच विजयची आई तव्यावर भाजत असलेली भाकरी, हे सगळंच चित्र डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसते आणि अस्वस्थ व्हायला होते. पावसाळ्यात या घराची ओढ तीव्र व्हायची. त्या छोट्याशा घरात माणसांची ये-जा कायमचीच होती. त्या रात्रीही असाच पाऊस झडत होता. आम्ही रात्रीचे जंगल बघण्यासाठी येणार याची जाणीव अगोदरच करून दिली होती. तव्यावर खरपूस भाजलेल्या भाकरीचा आणि धुराचा वास घरात भरून राहिलेला. पावसामुळे आलेल्या ओलसरपणाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या. भाकरीचा एक दाळ टोपलीत तयार झाला होता. भाकरी करून संपल्या तरीही चूल धगधगत होती. चुलीतला जाळ तिनं बाहेर ओढून घेतला. तिथं जवळच असलेली कोयती ओढून तिच्यावर कांदा व हिरवी मिरची कचाकचा कापून ती गरम तव्यावर सोडली. चर्र असा आवाज झाला आणि तेवढ्याच वेगाने तव्यावरून धूर निघाला. चार-पाच थेंब फक्त त्यावर खोबरेल तेल सोडले, कांदा परतून घेतला. तो खरपूस भाजल्यावर अगदी मोजकीच मिळालेली कुरताळी अळंबी तिने हातानेच कुस्करून तव्यावर पसरवली. चवीपुरते मीठ आणि आमसुले घालून परतवून तवा खाली उतरवला.
बाहेर पावसाने जोर धरला होता. माझ्या पुढ्यात टम्म फुगलेल्या भाकऱ्या आणि तव्यावरचे कुरताळी अळंब्यांचे तोणाक! अळंबी आणि तिची चव ओळखीची झाली तो क्षण हाच होता. एरव्ही अळंबी म्हणजे ‘कुत्र्याची छत्री’, ती खायची नसतात. अळीपासून ती तयार होतात, अळंबी म्हणजे बुरशी वगैरे… असेच विचार ऐकून ऐकून वय वाढत गेले. परंतु जेव्हा सह्याद्रीशी जोडली गेले, या परिसरात असलेली वैभवशाली जैवविविधता प्रत्यक्षात अनुभवली तेव्हा मात्र अळंबी, त्यांचे प्रकार, त्यांतील पौष्टिकता, लोकमानसाचे तिच्याप्रती असलेले हळवे बंध उलगडत गेले.
गोव्यातील पश्चिम घाट बुरशीच्या वैविध्यपूर्ण प्रजातीने समृद्ध आहे. वृक्षवेलींचे वैभव मिरवणाऱ्या पश्चिम घाटाच्या जंगलात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालापाचोळ्याच्या कचऱ्याचे मातीत रूपांतर करण्याचे कार्य वाळवी करीत असते. येथे मोठ्या आवडीने खाद्यान्न म्हणून आस्वाद घेतली जाणारी ‘रोयण अळंबी’ ही प्रजाती वारुळात आषाढ-श्रावणाच्या कालखंडात दृष्टीस पडते. मान्सूनचा हा कालखंड अळंब्यांसारख्या कवकाच्या निर्मितीला पोषक असतो. जंगलात दिसणारी मोठमोठी वारुळे ही खरेतर मुंग्यांचे वास्तुकलाकौशल्यच आहे. याच वारुळावर आषाढ-श्रावणाच्या कालखंडात अळंबी दृष्टीस पडतात. आणि याच अळंब्यांच्या प्रजातीला गोवा-कोकणातील लोकमानसात विशेष मागणी आहे. चित्पावन, कऱ्हाडे आदी ब्राह्मण समाजासाठी खाद्यान्न म्हणून अळंबी निषिद्ध मानली जातात. परंतु अन्य जाती-जमातीसाठी अळंबी ही खरे तर पौष्टिकता आणि त्यातील औषधी गुणधर्मांमुळे महत्त्वपूर्ण असतात. आज ‘रोयण’ अळंब्यांशिवाय ‘शीत अळंबी’, ‘कांडाळी’, ‘टोक्याळी अळंबी’, ‘फुगो’, ‘शिरांगर’, ‘कुरताळी’, ‘चोचयाळी’ वगैरे अळंबी खाद्यान्न म्हणून वापरली जातात. काही विषारी अळंबीही असतात, ती ओळखता यायला हवी. फणस अळंबी, जी फणसाच्या झाडावर येतात ती औषधी असतात असे जाणकार सांगतात. पश्चिम घाटात पस्तीसच्या आसपास खाद्यान्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या अळंब्यांच्या प्रजाती असून गोव्यात काणकोण ते पेडण्यापर्यंत सुमारे बारा प्रजातींचा आस्वाद घेतला जातो. परंतु या कवकाच्या खाद्यान्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या अळंब्यांच्या प्रजातीत लोकमानसाने ‘रोयण’ अळंब्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.
मुंग्यांसाठी अधिवास ठरलेले हे वातानुकूलित वारूळ निसर्गातील एक चमत्कार आहे. गोवा-कोकणात तसेच या भूप्रदेशाशी संलग्न असलेल्या घाटमाथ्यावरच्या कर्नाटक प्रदेशात वारूळ हे केवळ निसर्गाची कलाकृती नसून त्याला दैवी अधिष्ठान लाभलेले आहे. मान्सूनच्या पावसाचे जेव्हा आगमन व्हायचे असते तेव्हा त्याचा सुगावा जणूकाही वरूळातील वाळवीला लागतो. आणि तिला पंख फुटतात. वारुळातून मग प्रकाशाकडे झेपावत पावसाची वर्दी देतात. ज्येष्ठ पाऊस कोसळल्यावर आषढ सरी येतात. आषाढ मध्यावर येतो तेव्हा जंगल-निवासी तसेच ग्रामीण भागातील लोक अळंब्यांच्या शोधात भटकंती करतात. वारूळ हे वाळवीचे निवासस्थान. त्यात बऱ्याचदा धामणसारखा साप मुंग्यांना खाण्यासाठी येतो. कधी वारुळाच्या परिसरात नाग सर्प दिसतो. त्यामुळे वारूळ आणि साप यांचे ऋणानुबंध लोकमानस मानत आलेले आहे. वारुळावर जेव्हा अळंब्यांच्या कळ्या दिसतात तेव्हा तिथे एखाद्या झाडाची फांदी टाकून त्याच्यावर मालकी सांगतात. अशी पहिली हेरून ठेवून त्यावर अलिखित मालकी सांगितलेली अळंबी दुसरे कोणी काढीत नसत. अळंबी काढतानासुद्धा ती सगळीच काढीत नसत. गरजेपुरती काढून उर्वरित तशीच रोयणीवर राहू दिली जायची; जेणेकरून त्यांचे बी मोडता कामा नये. धनगर समाज रानोमाळ भटकणारा, रानांचा त्यांचा अभ्यास दांडगा. ते ‘रोयणी’वरील अळंबी काढताना खास पद्धतीचा अवलंब करीत असत. चुरण, गेळ, तोरणी अशा काटेरी झाडांच्या फांद्या घेऊन, रोयणीभोवती फिरवून मग डाव्या पायाने एखादे अळंबे चिरडून मग ती काढली जायची. एकदमच अळंबी काढण्यासाठी हात घातला तर रोयण घाबरते आणि मग त्यावर अळंबी येत नाहीत असे लोक मानतात. गोवेकरांचा अळंब्यांवर जीव. बाजारात विक्रीसाठी आलेली अळंबी मग ती कितीही किमतीची असली तरी विकत घेतल्याशिवाय त्याला स्वस्थ बसवत नाही. काहीवेळ तो घासाघीस करेलही. मग मात्र ती विकत घेताना ऋतूतच तर खायची, मग कितीही आठवण काढली तरी खायला मिळणार थोडीच! असेच स्वतःला समजावीत तो ती सायल्याच्या, करमळ, चांदीवड्याच्या पानात बांधलेली पुडी घेणारच. अळंब्यांचा आकार छत्रीसारखा. कदाचित याच आकाराची मोहिनी लोकमनाला पडली म्हणूनच की काय शिगमोत्सवात सहभागी होणाऱ्या तरंगांचा आकार अळंब्यांसारखाच केलेला आहे.
सत्तरीतील रावण आणि घोटेलीच्या परिसरात अळंबो डोंगरसुद्धा अळंब्यांचीच आठवण करून देतो. इथे एकेकाळी दाट जंगल होते. आता मात्र या ठिकाणी जंगली झाडांच्या जागेवर काजूची लागवड केलेली आहे, त्यामुळे डोंगराच्या नावानेच फक्त अळंब्यांची स्मृती जिवंत आहे. जुने गोव्याचे नाव ‘एला’ असे होते. ‘एला’ हे पृथ्वीचे नाव. आदिवासी समाजात तर अळंबी पूर्वीपासूनच प्रचलित होती. जुने गोव्याच्या या परिसरातील आदिवासी आजही अळंबी विक्रीसाठी सागवानाच्या पानांचा वापर करताना दिसतात.
अळंबी मऊ, लुसलुशीत, अती नाजूक, पटकन कुजणारी. ती औषधी गुणधर्मांनी युक्त. मधुमेहावर जास्त गुणकारी म्हणूनही तिचा वापर आहारात केला जातो. हे असे औषधी गुणधर्म असल्याने अलीकडे अळंब्यांना अक्षरशः ओरबाडून कोवळ्या कळ्यांसकट उपटून काढली जातात. अळंबी काढण्याची ही पद्धत पूर्ण चुकीची आहे. राखीव जंगलक्षेत्र, राष्ट्रीय उद्यान अशा आरक्षित केलेल्या जंगलात अळंबी काढणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून निसर्गाला ओरबाडले जात आहे.
हळदीच्या पानात अळंबी, मीठ-मिरची, कोकम सोल वगैरे घालून ती पाने गच्च बांधून चुलीत रसरशीत इंगळ्यावर भाजून तयार केलेल्या पोटलीची चवच न्यारी आहे. शिवाय अळंब्यांचे कालवण नाचणीच्या भाकरीबरोबर खाण्यात जी मजा आहे ती काही औरच! एखाद दुसरे अळंबे इंगळ्यावर ठेवून ते भाजून खाण्यातीलही लज्जत न्यारी! आज बाजारात विविध प्रकारची, आकाराची अळंबी आलेली आहेत. त्यातील बरीचशी तृणापासून तयार केली जातात. अर्थात या अळंब्यांना नैसर्गिक चव नाही. तरीही ती नैसर्गिक अळंब्यांना पर्याय बनलेली आहेत. एखादी सुकलेली फांदी, झाडावर बुरशीरूपी उगवलेली अळंबी दिसतात. ती खाण्यासाठी नसतात तर त्यांची फक्त नक्षी डोळ्यात भरून घेण्यासाठी. पावसाळ्यात जर जंगलात भ्रमंती केली तर रात्रीच्या वेळी काही खास अळंबी एकदम चकाकत असल्यासारखी दिसतील. रात्रीच्या गुडूप काळोखात ही अळंबी- जी ‘बायोलुमिनियस फंगस ‘ म्हणून प्रचलित आहेत- ती एकदमच लक्ष वेधून घेतात. जंगलाचाच हिरवा रंग आणि तोच रंग चकाकत ठेवून जंगलाच्या सौंदर्यात अधिक भर घालणारी ही अळंब्यांची प्रजाती अभ्यासकांसाठी सुवर्णसंधी असून त्यावर संशोधन करून अधिक जाणून घेण्याची ऊर्मी निर्माण करणारी आहे. नैसर्गिकरीत्या फक्त ऋतूत उमलणारी ही अळंबी खाण्यासाठी लोक आसुसलेले असतात. पावसाची उघडीप सुरू झाली, आषाढी एकादशी सरली की मग ही ओढ अधिकच तीव्र होत जाते. रोयण अळंबी बटणासारखी, कधी मोगऱ्याच्या कळीसारखी भासतात, तर शिरंगार किंवा शृंगार अळंबी तिच्या बहराच्या वेळी अनुभवली तर खूपच सुंदर, विलोभनीय आणि आकर्षक वाटतात. या अळंब्यांचे उमलणे हा जणू काही धरित्रीचाच शृंगार असावा असेच ते दृश्य दिसते.
जे दुर्मीळ असते त्याची ओढ नेहमीच मनाला लागते, पण त्याचबरोबर ते टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. आज ज्या वेगाने आधुनिकतेच्या नावावर जंगलांचा विद्ध्वंस होत आहे ते पाहता अळंब्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या राखून ठेवल्या तरच त्याची चव आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी टिकेल. अळंबी शाकाहारी की मांसाहारी? ती श्रावणात खायची की खायची नाहीत? यावर अनेकांचे मतभेद आहेत. असे असतानाही खवय्यांचे अळंबीप्रेम तसूभरही कमी झालेले नाही!