राज्यात धार्मिक कलह निर्माण करण्याचे
प्रयत्न कदापि सफल होणार नाहीत…

0
6

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विशेष मुलाखत

मुलाखत ः बबन भगत

गोवा मुक्तीच्या वर्षापासून आतापर्यंत राज्यात कधीही धार्मिक कलह अथवा दंगली झालेल्या नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक आता आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्यात धार्मिक कलह निर्माण करू पाहत आहेत, पण त्यांना त्यात कदापि यश येणार नाही…

प प्रश्न ः गोव्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपल्या भावी योजना व स्वप्ने कोणती आहेत?
प्र उत्तर ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न आहे. 2056 सालापर्यंत त्यांना नवभारताचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यात गोवा मागे राहू नये यासाठी कृषी क्षेत्रापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रांचा आम्ही विकास साधू पाहत आहोत. त्यासाठी आम्ही राज्यात खास करून कौशल्य विकासावर भर देत आहोत. ‘स्किलिंग’ ‘रीस्किलिंग’ आणि ‘अपस्किलिंग’ या कामावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत आम्ही ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना आमच्या मागच्या सरकारच्या कार्यकाळात सुरू केली होती. सुरुवातीपासून या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला व खास करून राज्यातील कृषीक्षेत्राला मोठी चालना मिळाली. आमच्या सरकारच्या आताच्या कार्यकाळात ‘आत्मनिर्भर गोवा 2.0′ पूर्वीपेक्षा जोमाने सुरू आहे. त्याशिवाय गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यावर आम्ही आता भर देणार आहोत. गोव्याचे रूपांतर शैक्षणिक केंद्रात (एज्युकेशनल हब) करण्याचे जे आश्वासन आम्ही जनतेला दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी खासगी विद्यापीठे येण्यासाठीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. त्याशिवाय माहिती तंत्रज्ञान उद्योग, इलेक्ट्रॉनिक उद्योग, पर्यटनाशी संबंधित उद्योग, आदी उद्योगांबरोबरच अक्षय्य ऊर्जा योजनेवर भर दिलेला आहे. 2050 पर्यंत देशात शून्य कर्ब उत्सर्जन असणारेे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरावे यादृष्टीने राज्यात अक्षय्य उर्जा प्रकल्पांवर भर देण्यात येणार आहे.

प प्रश्न ः वाढत्या बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी सरकारची काय योजना आहे? सरकारी नोकऱ्यांमागे धावणाऱ्या गोमंतकीयांना आपण काय सल्ला द्याल?
प्र उत्तर ः आम्ही राज्यात ‘ॲप्रेंटिसशीप’ योजना सुरु केलेली आहे. या योजनेमुळे राज्यात श्रम संस्कृती निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. युवावर्गाने त्यांना जी नोकरी मिळेल ती स्वीकारायला हवी. मग ती खासगी असो अथवा सरकारी. जी नोकरी मिळेल ती स्वीकारून काम केले तर भविष्यात चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. आता खासगी क्षेत्रातही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्याशिवाय युवावर्गाने स्वयंरोजगाराचाही विचार करायला हवा. रोजगाराच्या नव्या नव्या संधी सर्वांसाठीच उपलब्ध व्हाव्यात यासाठी आता सरकार ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेखाली गृहिणींनाही कौशल्य शिक्षण देत आहे. महिला स्वयंसेवी गटांद्वारेही आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. या कौशल्य विकासामुळे वाढत्या बेरोजगारीची समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. आम्ही सुरू केलेल्या राज्य ॲप्रेंटिसशीप योजनेचा लाभ घेणाऱ्या युवक युवतींची संख्या लवकरच 10 हजारांची संख्या पार करणार आहे. ह्या 10 हजार युवक – युवतींमध्ये ह्या ॲप्रेंटिसशीप योजनेमुळे श्रम संस्कृती निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे हे फार महत्त्वाचे आहे.

प प्रश्न ः राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग कधी सुरू होऊ शकेल असे आपल्याला वाटते?
प्र उत्तर ः राज्यातील खाणपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत नऊ खाणपट्ट्यांचा लिलाव झालेला आहे. त्यातील पहिल्या खाणपट्ट्यातील एक खाण येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही सर्व ते प्रयत्न करीत आहोत. राज्यातील खाण उद्योग बंद पडला, त्याला आता बरीच वर्षे झालेली असून आता हा उद्योग विनाविलंब पूर्ववत सुरू व्हावा यावर सरकार भर देणार आहे. गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग शक्य तेवढ्या लवकर सुरू व्हावा, असे केंद्र सरकारलाही वाटत असून केंद्राकडूनही गोव्याच्या प्रयत्नांना साथ लाभत आहे. राज्यातील उर्वरित खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याबरोबरच ज्या खाणपट्ट्यांचा यापूर्वीच लिलाव करण्यात आलेला आहे, त्या खाणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याकडे सरकार खास लक्ष देणार आहे.

प प्रश्न ः राज्यातील पोर्तुगीजकालीन खुणा मिटवून टाकण्याची गरज आहे, असे आपण म्हटले होते. त्याविषयी काय सांगाल?
प्र उत्तर ः माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा व वेगळाच अर्थ काढण्यात आला. गोमंतकीयांनी पोर्तुगीज राजवटीची भलावण व स्तुती करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे, असे मला म्हणायचे होते. पोर्तुगिजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले होते. मात्र, बोलले जात आहे ते फक्त पोर्तुगिजांविषयीच. कदंबांची राजवट हा खरे तर गोव्याचा सुवर्णकाळ होता. कदंब राजवटीत राज्यात कित्येक भव्य व सुंदर अशा मंदिरांचे बांधकामही झाले होते. पोर्तुगीज राजवटीत पोर्तुगिजांनी मोडून टाकलेल्या मंदिरांचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
पोर्तुगीज काळात बांधण्यात आलेल्या वास्तू आम्ही मोडू पाहत असल्याचा खोटा प्रचारही काही लोक करीत आहेत. पोर्तुगिजांनी आपल्या राजवटीत येथे काही चांगल्या वास्तू उभ्या केल्या, ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालय पोर्तुगीज राजवटीत उभे राहिले होते. आम्हाला अशा गोष्टींची कोणतीही मोडतोड करायची नाही.

प प्रश्न ः राज्यातील अल्पसंख्यक असलेले ख्रिस्तीधर्मीय आता भाजपला स्वीकारू लागले आहेत असे आपल्याला वाटते काय?
प्र उत्तर ः माझ्या मंत्रिमंडळात सध्या तीन ख्रिस्तीधर्मीय मंत्री आहेत. भाजपला सर्वांकडून पाठिंबा मिळू लागलेला आहे. अमूकच पक्ष अमूकच धर्माच्या लोकांचा असे कुठे आहे? गोव्याचे लोक स्वतंत्र विचारसरणीचे असून त्यानुसार ते आपल्याला पाहिजे हव्या त्या पक्षाला पाठिंबा देत असतात.

प प्रश्न ः मनोहर पर्रीकर यांनी ‘मिशन सालसेत’ केले होते, तशी एखादी मोहीम आपणही राबवावी असे तुम्हाला वाटले नाही काय?
प्र उत्तर ः मिशन सालसेत करण्याचा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही आणि ते मी करणारही नाही. मी सासष्टीत जातो, तेव्हा तेथील ख्रिस्ती बांधवांची भेट घेतो. ख्रिस्तीधर्मींयांमध्येही माझे हितचिंतक व मित्र आहेत. ख्रिस्ती बांधवांनीही आता आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे.

प प्रश्न ः मागच्या निवडणुकीत भाजपला सासष्टीतून कसा प्रतिसाद मिळाला?
प्र उत्तर ः मागच्या विधानसभा निवडणुकीत सासष्टी तालुक्यातून आम्हाला जेवढ्या मतांची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा काही अंशी कमी मते मिळाली. अन्य तालुक्यांतही आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा थोडी कमी मते आम्हाला मिळाली, परंतु हे चित्र बदलण्याचा आम्ही प्रयत्न करू.

प प्रश्न ः म्हादई नदीचा मुद्दा हा तुमची परीक्षा पाहणारा होता, असे वाटते काय?
प्र उत्तर ः म्हादई प्रश्नी आमची भूमिका ही स्पष्ट होती. म्हादई प्रश्नी आम्ही कधीही तडजोड केली नाही. या प्रश्नी आमचा सर्वोच्य न्यायालयातही लढा चालू आहे आणि मला म्हादई प्राधिकरणाचीही स्थापना करण्यात आली आहे. म्हादईचा लढा चालूच राहणार आहे. त्यामुळे म्हादईप्रश्नी कुणी चिंता करण्याची गरज नाही.

प प्रश्न ः कोकणी आणि मराठी या भाषांविषयी आपली भूमिका काय आहे?
प्र उत्तर ः कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषा राज्यात बोलल्या जात असून दोन्ही भाषांवर आमचे प्रेम आहे. त्याबाबत आम्ही दुजाभाव करीत नाहीत. गोव्यातील लोक कोकणी भाषेतून बोलतात, मराठी वाचतात आण्ाि लिहितात आणि हिंदी भाषेतील चित्रपट पाहतात.

प प्रश्न ः राज्यातील मराठी प्राथमिक शाळा बंद पडू लागलेल्या असून शाळांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. त्याविषयी काय सांगाल?
प्र उत्तर ः राज्यातील इंग्रजी प्राथमिक शाळांमुळे मराठी प्राथमिक शाळा बंद पडू लागलेल्या आहेत. लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळांत पाठवू लागले आहेत. परिणामी, मराठी माध्यमातील प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी होऊ लागलेली असून शाळा बंद पडू लागल्या आहेत. पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांत पाठवण्याऐवजी मराठी माध्यमातील प्राथमिक शाळांत पाठवल्यास मराठी माध्यमातील प्राथमिक शाळांना जीवदान मिळू शकेल.

प प्रश्न ः छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे व त्यांच्याविषयी केली जाणारी वादग्रस्त विधाने यामुळे राज्यात हल्ली तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्याविषयी काय सांगाल?
प्र उत्तर ः छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराजांविषयी कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. गोव्यासाठी महाराजांनी खूप काही केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील सप्तकोटीश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली. त्यामुळे राज्यातील अन्य मंदिरांचेही अस्तित्व टिकून राहण्यास मदत झाली. गोव्यात हिंदू, मुस्लीम व ख्रिस्ती बांधव हे सलोख्याने एकत्र राहत आले आहेत. 1961 या गोवा मुक्तीच्या वर्षापासून आतापर्यंत राज्यात कधीही धार्मिक कलह अथवा दंगली झालेल्या नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक आता आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्यात धार्मिक कलह निर्माण करू पाहत आहेत, पण त्यात त्यांना कदापि यश येणार नाही.

प प्रश्न ः दै. नवप्रभा आज आपला वर्धापनदिन साजरा करीत आहे.
प्र उत्तर ः दै. नवप्रभा हे एक दर्जेदार असे दैनिक आहे, जे नेहमीच गुणवत्तापूर्ण बातम्या देत असते. दै. नवप्रभाची पत्रकारिता ही निष्पक्षपाती पत्रकारिता आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा सरकारची चूक दाखवून देणे, टीका करणे हे काम तर हे दैनिक करतेच, परंतु सरकारने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही हे दैनिक करीत असते. जे सत्य लिहायला हवे तेच त्यात लिहिले जाते. नुुुवप्रभेच्या पत्रकारितेची परंपरा मोठी आहे. मी जेव्हा लहान होतो, तेव्हाही आमच्या घरी हे दैनिक यायचे. तेव्हापासून मी नवप्रभा वाचत आलो आहे. गोव्यातील ते एक नावाजलेले दैनिक आहे व या दैनिकाविषयी मला आदर आहे!