>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती; 134 महिला-मुले अजूनही बेपत्ता; पिंक पोलीस दलात पोलिसांची संख्या वाढवण्याची वीरेश बोरकर यांची मागणी
गेल्या साडेतीन वर्षांत बेपत्ता झालेल्या 829 महिला आणि मुलां-मुलींपैकी 695 जणांचा शोध लागला असून, 134 जण अजून बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या 134 जणांपैकी जास्तीत जास्त या प्रौढ महिला आहेत, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने बोलताना दिली. ज्या युवती, महिला अद्यापही बेपत्ता आहेत, त्या बेपत्ता होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार वीरेश बोरकर यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या पिंक पोलीस दलासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना आमदार वीरेश बोरकर यांनी महिलांच्या व मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या पिंक पोलीस दलात पोलिसांची संख्या खूपच कमी असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या दलात केवळ 61 पोलीस असून, केवळ एक पोलीस निरीक्षक आहे. या दलाकडे असलेल्या वाहनांची संख्याही कमी असून, त्यांच्याकडे केवळ 11 वाहने आहेत व ती देखील अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांची व गुन्ह्यांची संख्या ही मोठी असून, त्या तुलनेत पिंक फोर्समधील पोलिसांची संख्या ही बरीच कमी असल्याचेही ते म्हणाले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पिंक पोलीस दलाची स्थापना ही दीड वर्षांपूर्वीच झालेली आहे. मात्र, पिंक पोलीस दलात असलेल्या पोलिसांची संख्या कमी आहे याचा अर्थ राज्यातील महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था कमी आहे असा कुणी काढू नये. राज्यातील दर एका पोलीस स्थानकावर महिला उपनिरीक्षक आहेत हे विसरता कामा नये, असे सावंत म्हणाले.
पिंक पोलीस दलात असलेल्या पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे यावेळी बोरकर यांनी निदर्शनास आणून दिले असता या दलातील पोलिसांची संख्या गरजेनुसार वाढवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी बोरकर यांनी पिंक पोलीस दलातील पोलिसांना समुपदेशनासह प्रथमोपचार व अन्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याची सोय सरकारने करावी, अशी मागणी दिली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या पोलिसांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देताना आलेले असून, भविष्यात सपुपदेशन व अन्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याचीही सोय करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
चालक म्हणून महिलांचीच भरती करा : आरोलकर
यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी पिंक पोलीस दलात चालक म्हणून पुरुषांची भरती केलेली असून, तेथे चालक म्हणून महिलांचीच भरती केली जावी, अशी सूचना केली. त्यावर बोलताना ही सूचना चांगली असून, त्यावर विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
अतिरिक्त उपनिरीक्षक लवकरच नेमणार
जेव्हा पिंक फोर्सची स्थापना करण्यात आली होती, तेव्हा किनारपट्टी भागांत महिलांवर होणारे अत्याचार व गुन्हे यांचा विचार करुनच या फोर्सची स्थापना करण्यात आली होती. नव्याने भरती केलेल्या महिला उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते सेवेत दाखल झाले की त्यातून पिंक फोर्ससाठी अतिरिक्त उपनिरीक्षकांची सोय करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.