>> खोट्या फोनमुळे मुंबई पोलिसांसह गोवा व कोकण पोलिसांची झाली धावपळ
आरडीएक्स घेऊन गुजरातमधून एक टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा मुंबई पोलिसांना आलेला एक फोन दिशाभूल करणारा होता, असे काल अखेर तपासाअंती उघड झाले; मात्र नीलेश पांडे नामक इसमाकडून आलेल्या ह्या फोन कॉलमुळे मुंबई पोलिसांसह गोवा व कोकण पोलिसांचीही झोप उडाली. ज्या टँकरमध्ये आरडीएक्स असल्याचा दावा केला जात होता, तो टँकर रत्नागिरी जिल्ह्यात ताब्यात घेण्यात आला; मात्र त्यात आरडीएक्स नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. दरम्यान, या प्रकरणी नीलेश पांडे याला पोलिसांनी काल अटक केली.
मुंबई-गोवा महामार्गावर स्फोटकांनी भरलेला एक टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी मध्यरात्री मिळाली होती आणि त्यामुळे मुंबई पोलिसांसह कोकण व गोवा पोलिसांनी विनाविलंब महामार्गावर शोधमोहीम हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमेवर नाकाबंदी करून सर्व वाहनांची कडक तपासणी केली जात होती. शोधमोहिमेदरम्यान रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे ज्या टँकरमध्ये आरडीएक्स असल्याचे फोनवरून मुंबई पोलिसांना कळवण्यात आले होते, तो ताब्यात घेण्यात आला; मात्र त्यात पोलिसांना आरडीएक्स सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या टँकरमध्ये पॉलिथिनी तयार करण्याचे सामान आढळून आले.
गोव्याच्या सीमेवर तपासणी
आरडीएक्स स्फोटके भरलेला टँकर गोव्याच्या दिशेने येत असल्याची माहिती देणारा फोन आल्यामुळे राज्यात शनिवारी मध्यरात्रीपासून सीमेवर सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. सीमेवरील सर्व तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू होती. नंतर सीमेवरील नाकाबंदी उठवण्यात आली.
खोटी माहिती देणाऱ्या इसमास अटक
खोटी माहिती दिल्याचे कळताच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कामाला लागली. गुन्हे शाखा युनिट 7 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत नीलेश पांडे याला कांजुरमार्ग येथून शोधून काढले. नंतर त्याला रितसर अटक करण्यात आली.
…म्हणून दिली खोटी माहिती
भाईंदर परिसरात नीलेश पांडे हा आपल्या स्कूटीवरून जात होता. मद्याच्या नशेत स्कूटी चालविणाऱ्या नीलेशला टँकरचा धक्का लागला. स्वतःची चूक असतानाही त्याने टँकर चालकाला धडा शिकविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि टँकरचा क्रमांक देऊन स्फोटकांबाबत खोटी माहिती दिली.