उत्तर भारतातील अनेक राज्यांत पूर स्थिती

0
17

>> हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

>> आतापर्यंत देशात 243.2 मिलीमीटर पाऊस

देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असून उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. देशातील मान्सूनला जूनमध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे जरी उशीर झाला तरी उशिराने दाखल होऊनही पावसाने दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात कहर मांडला आहे. जुलै महिन्यात पावसाने देशात सर्वत्र थैमान घातले आहे. देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून हवामान खात्याकडूनही उत्तर भारतातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारादेखील दिला आहे. हवामान खात्याने आठ राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले आहे. त्यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.

उत्तर भारतात पावसाने जोर धरला असून तिथे गेल्या दोन दिवसांपासून 12 जणांचा मृत्यू झाला असून येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 243.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे. शनिवार 8 जुलैपासून उत्तर भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस कोसळत असून या मुसळधार पावसाने अनेक नवीन रेकॉर्डदेखील बनवले आहेत. दिल्लीमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये 153 मिमी पाऊस झाला आहे.

हरियाणा, पंजाबला झोडपले
उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब या राज्यांना तेसच चंढीगडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून या राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे. चंढीगडमधील मोहाली जिल्ह्यात पावसाने जराही उसंत घेतली नाही. तर पंजाब आणि हरियाणा राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील चोवीस तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असून हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असून गेल्या 24 तासांत राज्याच्या विविध भागात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिमला जिल्ह्यातील कुमारसैन भागात एका जोडप्याचा आणि एका मुलाचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. राज्यात 13 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तराखंडात रेड अलर्ट
उत्तराखंड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे मुसळधार पावसामुळे उत्तराखंडातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात भूस्खलन होण्याची शक्यता असून योग्य ती काळजी घ्या असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले आहे.

राजधानी दिल्लीत शाळांना सुट्टी
देशाची राजधानी दिल्लीतही संततधार मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी मुसळधार पावसामुळे राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे काही खासदारांच्या बंगल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. खान मार्केटमध्ये पाणी शिरले आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. जुन्या लोखंडी पुलाजवळ यमुना धोक्याच्या पातळीच्या काही मीटर खालून वाहत आहे. मंगळवारी यमुना नदी 205.33 मीटर धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी 1 वाजता जुन्या रेल्वे पुलावर यमुनेची पाण्याची पातळी 203.18 मीटर होती. इशारा पातळी 204.5 मीटर आहे, असे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतात काय स्थिती
पुढील पाच दिवसात उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. बिहारमध्ये 12 जुलै दरम्यान, झारखंडमध्ये 11 ते 12 जुलै दरम्यान आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 10 जुलै दरम्यान खराब हवामानाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस
जम्मू आणि काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टदेखील देण्यात आला आहे. या राज्यातील प्रशासनाकडून नागरिकांना तसेच पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये शाळांनादेखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शनिवारी दोन जवान पुंछ परिसरात गस्त घालत असताना दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात दोन जवान वाहून गेले आहेत.

मुसळधार पावसाचा अंदाज
सध्या उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड, राजस्थान (पूर्व), जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस पंजाब, हरियाणा-चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचण्याची शक्यता आहे.

कोकण, गोव्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने 11 जुलैपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील घाट भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांत कर्नाटकात काही भागात हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मध्य भारतातील विविध राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.