गोव्यात मॉन्सून पर्यटनाला चालना

0
8

>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती

राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे आता गोव्यात मॉन्सून पर्यटनाला चालना मिळाली असून राज्यात मोठ्या प्रमाणात देशी तसेच विदेशी पर्यटक मॉन्सून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येऊ लागले आहेत. मॉन्सून पर्यटनासाठी राज्यात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आता आम्ही ट्रेकिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग, तसेच सांजांव, चिखल काला आदी पावसाळ्यात साजरे केल्या जाणाऱ्या सणांची माहिती देण्याबरोबरच पावसाळ्यात हे सण मोठ्या स्तरावर व उत्साहात साजरे करण्यावर भर देणार असल्याचे काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यानी दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.

यंदा चिखलकाला हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. त्यामुळे पुढील वर्षी चिखलकाला आणखी धुमडक्यात साजरा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री खंवटे यानी सांगितले.
मॉन्सून पर्यटनासाठी अजूनही मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक गोव्यात यावेत यासाठी बोंदरां, सांजांव, गणेश चतुर्थी व अन्य काही सणांविषयीची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवण्यात येणार असल्याचे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय समुद्रातील जलक्रीडा मॉन्सूनमध्ये बंद करण्यात येत असल्याने आता या जलक्रीडा पावसाळ्यात राज्यातील विविध नद्यांमध्ये आयोजित करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहितीही खंवटे यांनी दिली. पावसाळ्यात पर्यटकांना ग्रामीण भागांतील छोट्या-मोठ्या मंदिरांचे दर्शन घडवण्याचाही विचार असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याद्वारे पावसाळ्यातील खेडेगावातील निसर्गाचे विहंगम असे दर्शनही पर्यटकांना घडू शकणार असल्याचे त्यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले.