राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
9

>> 13 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज; 14 रोजी होणार छाननी

>> 17 जुलै अर्ज माघारीचा दिवस; 24 रोजी निवडणूक

गोवा विधानसभा सचिवालयाने येत्या 24 जुलै रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठीच्या निवडणुकीची अधिसूचना काल जारी केली. राज्यसभा निवडणुकीसाठी गोवा विधानसभेच्या सचिव नम्रता उलमान यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 13 जुलैपर्यंत आहे.

गोव्याचे विद्यमान राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ येत्या 28 जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलातील व्हीआयपी ब्लॉकमध्ये येत्या 24 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात होणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची 13 जुलै ही शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 14 जुलै रोजी केली जाणार आहे. तसेच 17 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. राज्यातील चाळीस आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार आहे.

सत्ताधारी भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव निश्चित करून मान्यतेसाठी केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याची अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे. विरोधी कॉँग्रेस पक्षाने मात्र अद्याप राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाबाबत निर्णय घेतलेला नाही.