दाणादाण

0
10

हा पाऊस म्हणजे थेंबांमधुनी
प्रश्नांची सरबत्ती
मी काय खुलासे करू नभाला
इतका भिजल्यावरती…
मी रोज नव्याने वाचू पाहतो
पाण्याची अक्षरे
तर पाऊस काही नवेच लिहितो
माझ्या रस्त्यावरती…
कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या कवितेतल्या ह्या चार ओळी. पाऊस कवींना, लेखकांना भावतो, मोहवतो, परंतु सर्वसामान्य माणसाची मात्र त्रेधातिरपीट उडवून जातो. गेले काही दिवस राज्यात मुसळधार पावसाने जे थैमान मांडले आहे, त्यामध्ये नागरी सेवांची आणि सुविधांची नुसती दाणादाण उडवून दिली आहे. गेल्या जून महिन्यात खरे तर गोव्यात पावसाचे दरवर्षीच्या नेमाने आगमन होणार होते, पण ‘बिपरजॉय’चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तो दहा दिवसांनी लांबला. हे चक्रीवादळ गोव्याच्या सुदैवाने या भूमीवर भिरभिरत वर सौराष्ट्र, कच्छकडे निघून गेले, परंतु त्यानंतर बराच उशीर करून आलेला हा वार्षिक पाहुणा मात्र सतत ठाण मांडून बसला आहे. स्थानिक वर्तमानपत्रांची पाने पावसाच्या पाण्यात भरलेले रस्ते, घरादारांवर कोसळणारी झाडे, होणाऱ्या दुर्घटना यांच्या बातम्यांनी भरून निघाली आहेत. जो पाऊस वेळेवर येत नव्हता म्हणून जनता हवालदिल झाली होती, धरणाचा जेमतेम दोन चार टक्के उरलेला पाणीसाठा भरला नाही तर काय करायचे म्हणून चिंताक्रांत झाली होती, तीच आता मुसळधार पावसाच्या दणक्याने धास्तावली आहे. भारतीय हवामान खात्याने गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या अनुषंगाने राज्यात शाळा, महाविद्यालयांना काल सुट्टीही देण्यात आली. मात्र, आयत्या वेळी सुट्टी देण्याचा हा जो काही प्रकार बेशिस्त प्रकार संबंधितांकडून चालतो, त्यात थोडीतरी शिस्त येण्याची जरूरी आहे. वास्तविक, सहा जुलैसाठी हवामान खात्याने गोव्याला ‘रेड अलर्ट’ दिलेला नव्हता. तो दिला गेला होता कोकणातील जिल्ह्यांना. परंतु धास्तावलेल्या पालकांनी राजकारण्यांना साकडे घातले आणि सरकार सुटी देऊन मोकळे झाले. गेल्या महिन्यात उकाड्यासाठी सुटी द्या अशी मागणी पालकांनी करताच सुटी दिली गेली होती. सुट्टी जरूर द्यावी, मुलांना आणि त्यांच्यापेक्षा शिक्षकांना ती हवीच असते, परंतु त्याबाबत स्पष्टता असली पाहिजे आणि निर्णय वेळेत घेतला गेला पाहिजे. गुळमुळीत भाषेतील परिपत्रकांतून विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ का उडवून दिला जातो? वेधशाळेचे अंदाज काही एकाएकी वर्तवले जात नसतात. सध्या अकरा जुलैपर्यंतचे तपशीलवार संभाव्य हवामान वेधशाळेने वर्तवलेले आहे आणि हे सगळेच दिवस मुसळधार पावसाचे आहेत. एकीकडे असा मुसळधार पाऊस कोसळत असताना बार्देशमध्ये मात्र लोकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात समस्या उद्भवल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. अशी वेळ कोणावर येता कामा नये. गेल्या एक जूनला गोव्यात किंचित पाऊस झाला. त्यानंतर तब्बल दहा दिवस त्याने दडी मारली. मग 10 जूनपासून सत्तावीस जूनपर्यंत तो तुरळक प्रमाणात पडत राहिला. 28 जूनला राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. चोवीस तासांत 142.5 मि. मी. म्हणजे 5.61 इंच पाऊस पडला. असाच जोरदार पाऊस काल सहा जुलैला 133.6 मि. मी. म्हणजे 5.25 इंच झाला आहे. या पावसाने राज्यातील रस्त्यांची वाताहत केली आहे. आता किमान सहा महिने ह्या खड्ड्यांतून जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागेल. आजवर राज्यात पावसाचा तुटवडा होता. आता मात्र तो नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. उत्तर गोव्यात तो सरासरीपेक्षा 098.2 मि. मी. नी, तर दक्षिण गोव्यात 182.3 मि. मीने अधिक आहे. राज्याच्या जवळजवळ सर्व तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यातही आघाडी घेतली आहे ती सालसेतने. मडगावने पावसाच्या बाबतीत इंचांचे अर्धशतक ओलांडले आहे आणि केपे, सांगे, सत्तरी आणि इतर तालुके त्याच्या मागोमाग आहेत. या आठवड्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने राज्य सरकारने अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असेल. या मुसळधार पावसाने पिण्याच्या पाण्याच्या तुटीची चिंता मिटली याचा आनंदच आहे, परंतु येऊ शकणाऱ्या रोगराईबाबत जनतेच्या मनात चिंताही आहे!