डॉ. रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

0
14

अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या चर्चेत डॉ. शोभणे यांच्यासह प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांचीही नावे होती.
काल रविवारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत बहुमताने डॉ. शोभणे यांचे नाव निश्चित करण्यात आले. संमेलनाच्या तारखांबाबतही या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

रवींद्र शोभणे यांचा परिचय
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे हे एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 1989 मध्ये त्यांनी पीएच.डी. ची पदवी मिळवली. कादंबरीसोबत कथालेखक म्हणूनही त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1991 मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता.

साहित्यसंपदा
डॉ. शोभणे यांच्या कोंडी, पडघम, पांढरे हत्ती, प्रवाह, सव्वीस दिवस, तद्भव, रक्तध्रुव, अश्वमेध या कादंबऱ्या आणि चंद्रोत्सव, दाही दिशा, शहामृग हे कथासंग्रह मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांना ‘उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) चा पुरस्कार, मारवाडी प्रतिष्ठानचा घनःश्यामदास सराफ पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे कादंबरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.