अंजुणे धरण आटले; ‘पडोसे’तून मर्यादित पाणी

0
12

>> आता तिळारी धरणाच्या पाण्याचा आधार; शनिवारपासून पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित; जलस्रोतमंत्र्यांची माहिती

पावसाअभावी जून महिना कोरडा गेल्याने आता राज्यावरील पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. अंजुणे धरण जवळपास आटले असून, सद्य:स्थितीत पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून विविध भागांना कमी दाबाने मर्यादित पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर, तिळारी धरणातून अस्नोडा बंधाऱ्यात येणारे पाणी आता पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पात खेचण्यात येणार असून, त्यावर प्रक्रिया करून ते पुरवले जाणार असल्याची माहिती काल जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. पावसाचा पत्ता नसल्याने व जून महिना कोरडा गेल्याने अंजुणे धरणातील पाण्याची पातळी अगदीच खालावली आहे, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंजुणे धरणातील पाणी खेचण्यात येत असते आणि हे पाणी सत्तरी, डिचोली, साखळी व आसपासच्या भागांना पुरवण्यात येत असते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ज्या जलवाहिनीतून वाळंवटी नदीतील पाणी खेचून पडोसे प्रकल्पाला पुरविण्यात येत असते, त्या वाहिनीतूनच आता अस्नोडा बंधाऱ्यातून पडोसे प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया शनिवारपासून सुरू करण्यात येणार असून, या वाहिनीद्वारे नियंत्रितपणे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, घाट परिसरात चांगला पाऊस पडू लागल्याने ओपाच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने शिरोडा, फोंडा व तिसवाडी येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. म्हैसाळ व पंचवाडी धरणातील पाण्याची पातळीही तेथे कोसळत असलेल्या पावसामुळे वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.

23 ते 25 जून दरम्यान पावसाचा अंदाज

राज्यात मागील अकरा दिवस विविध भागात कमी-जास्त प्रमाणात पावसाची नोंद होत होती. तथापि, चोवीस तासांत राज्यातील कुठल्याही भागात पावसाची नोंद झालेली नाही. दरम्यान, येथील हवामान विभागाने राज्याच्या काही भागात येत्या 23 ते 25 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात आत्तापर्यंत सुमारे 6.88 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाच्या तुटीचे प्रमाण 71 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील तापमानातील वाढ कायम आहे.

आमठाणे धरणात 30 दिवसांचा पाणीसाठा

अंजुणे धरणातील पाणीसाठा पूर्णत: कमी झाला असून, धरण कोरडे पडले आहे. त्याचा परिणाम पडोसे जलप्रक्रिया प्रकल्पावर होणार आहे. परिणामी डिचोली तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. पाऊस गायब झाल्याने चिंता वाढली असून, पावसाचे आगमन लवकर झाले नाही, तर पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ शकते. दुसऱ्या बाजूला आमठाणे धरणात केवळ 30 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. साळ नदीतून पंपिंगद्वारे आमठाणे धरणात पाणी साठवले जाते, त्याचा उपयोग अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी होतो.

पावसाने पाठ फिरवल्याने वाळवंटी, डिचोली नदीच्या पाणीपातळीत खूपच घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर तिळारी धरणाचे पाणी विविध जलप्रक्रिया प्रकल्पांत वापरण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. पर्यायी व्यवस्थेसाठी जलसंपदा खात्याची धावपळ सुरू असून, पाणीपुरवठा खात्यानेही आपले प्रयत्न सुरू केले आहेत.
पावसाच्या आगमनापूर्वी बंधाऱ्यांच्या प्लेट्स काढण्यात आल्या होत्या; मात्र पाऊस गायबच असल्याने अस्नोडा, साखळी, डिचोली भागातील प्लेट्स पुन्हा घालण्यात आल्या असून, अस्नोडा पार नदीत मुबलक पाणीसाठा आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाणीपुरवठ्याबाबत सर्व ती खबरदारी व पर्यायी उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तिळारी आणि आमठाणे धरणातील पाण्याचे नियोजन करण्याबाबतही सूचना केली आहे.