हा छत्रपतींप्रती अनादर!

0
4

कळंगुट येथे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आणि तो हटवण्याची नोटीस पंचायतीने जारी करताच संघटितपणाच्या जोरावर सरपंचांना तो मागे घेण्यास आणि वर माफी मागण्यास लावण्याचा जो काही प्रकार घडला तो उचित तर नाहीच, उलट छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर युगपुरुषाचा अनादर करणारा आहे. शिवप्रेमाखातर छत्रपतींचा पुतळाच उभारायचा होता, तर त्यासाठी पंचायतीची आणि सर्व संबंधितांची रीतसर परवानगी घेऊन दिवसाउजेडी दिमाखाने तो उभारता आला असता. राज्यात तर छत्रपतींचा वारसा अभिमानाने मिरवणारे शासन सत्तेवर आहे. मग परवानगीविना रात्रीच्या अंधारात अशा प्रकारे बेकायदेशीरपणे पुतळा उभारण्याचे कारणच काय होते? छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त भारतीयांचे दैवत आहे. जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारे शिवराय आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात परकीय आक्रमकांनी काळ्याकुट्ट केलेल्या आकाशात एखाद्या विजेसारखे लखलखले. ज्यांच्या संपूर्ण चारित्र्यावर एकही काळा डाग नाही, अशा या महान विभूतीच्या नावाने हे जे काही पूर्णपणे बेकायदेशीर कृत्य तथाकथित शिवप्रेमींनी केले, ते महाराजांच्या वारशालाच कमीपणा आणणारे आहे. प्रसारमाध्यमेही भावनेच्या भरात वाहून जाऊन एकतर या पूर्ण बेकायदेशीर कृत्याचे हास्यास्पद रीतीने समर्थन करताना किंवा लोकभावनेला शरण जाऊन नरो वा कुंजरोवा करताना दिसत असताना हे रोखठोकपणे सांगण्याची या घडीला आवश्यकता आहे.
छत्रपती शिवरायांचा, त्यांचे पुत्र शंभूराजांचा गोव्याशी अगदी निकटचा संबंध होता. गोव्यातील पोर्तुगीज राजसत्तेला जरब बसवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मोहिमा आखल्या हा इतिहास आहे. अनेकदा तो काही घटकांकडून नाकबूल केला जातो हा भाग वेगळा, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजीराजे यांचा धाक होता म्हणूनच गोव्याच्या बऱ्याच भूभागाला त्यांच्या हयातीत हात लावण्याची पोर्तुगिजांची टाप झाली नाही हे विसरून चालणार नाही. 1658 मध्ये शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणवर स्वारी केली तेव्हापासून पोर्तुगिजांना त्यांचा नेहमी धाकच राहिला. रुई लैंताव द व्हिएगस या पोर्तुगीज कारागिराची आपले आरमार बांधण्यासाठी महाराजांनी मदत घेतली याचा दाखला काही महाभाग देत असतात, परंतु तो तयार करीत असलेल्या युद्धनौका अखेरीस आपल्याच मुळावर येतील हे कळून चुकताच पोर्तुगिजांच्या सत्तेखालील वसईच्या कॅप्टनने त्या कारागिराला नोकरी सोडायला लावली होती हे मात्र सांगितले जात नाही. 1666 मध्ये विजापूरकरांच्या ताब्यातील फोंड्याच्या किल्ल्याला महाराजांनी वेढा घातला तेव्हा, 1667 मध्ये बार्देशात सैन्य घुसवून, धर्मांतरे करणाऱ्या चार पाद्य्रांना ठार मारले तेव्हा किंवा 1675 मध्ये कुंकळ्ळीत सैन्य घुसवले तेव्हा पोर्तुगिजांची कशी पाचावर धारण बसली होती त्याचे दाखले इतिहासात पानोपानी आहेत. महाराजांचे 1680 मध्ये निधन झाले तेव्हाही त्यांचे सरदार गोवा मुक्त करण्यासाठी येत असल्याच्या वार्ता आल्याने हादरलेल्या पोर्तुगिजांनी कुंकळ्ळीत सैन्य पाठवले होते. शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजांनीही पोर्तुगिजांवर तसाच वचक ठेवला. त्यांनी 1683 मध्ये फोंड्याला वेढा दिला, साष्टी आणि बार्देशमध्ये आपले घोडदळ आणि पायदळ घुसवले तेव्हाही पोर्तुगिजांच्या पायाखालची वाळू सरकली होती. शेवटी 1683 च्या डिसेंबरमध्ये संभाजीराजांनी थेट सांतइस्तेव्ह बेटावरील किल्ला काबीज केला. तेथील हातघाईच्या लढाईत दीडशे पोर्तुगीज सैनिक मारले गेले आणि जे उरले ते त्या बेटावर अडकून पडल्याने त्यांची दाणादाण उडाली. पळण्याच्या प्रयत्नात अनेकजण बुडून मेले, जे उरले ते कापले गेले. स्वतः संभाजीराजांनी त्वेषाने आपला घोडा पाण्यात घुसवला होता म्हणतात तो याच घटनेत. शेजारच्या गोवा बेटावरील पोर्तुगिजांचे पाय तेव्हा कसे थरथरले असतील हे वेगळे सांगायला नको. शिवरायांचा किंवा शंभूराजांचा वारसा बेकायदेशीर पुतळे उभारल्याने जपला जाणार आहे का? कळंगुट पंचायतक्षेत्रात इतर अनेक बेकायदेशीर गोष्टी आहेत म्हणून आम्हीही बेकायदेशीर कृत्य करणार हा युक्तिवादच हास्यास्पद आहे. कळंगुट पंचायतीनेही जी तत्परता दाखवली तीच पंचायतक्षेत्रातील अन्य बेकायदेशीर गोष्टींबाबतही दाखवली जात नाही म्हणूनच या आंदोलनाला एवढे जनसमर्थन लाभले. शेवटी, शिवपुतळ्याचे हे जे काही राजकारण झाले, ते त्या भागामध्ये धार्मिक ध्रुवीकरण घडवून राजकीय ईप्सिते साध्य करण्याच्या एखाद्या षड्यंत्राचा भाग आहे का व आपण नकळत त्याला बळी तर पडलेलो नाही ना, हे या आंदोलनात सहभागी झालेल्या सच्च्या शिवप्रेमींनी एकदा शांतपणे जरूर तपासावे!