पेडण्यातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर

0
8

>> मंत्री नीलेश काब्राल

>> जलवाहिनी घालण्यास भूसंपादनासाठी सहकार्य हवे

पेडणे मतदारसंघात सुमारे 4 एमएलडी पाण्याची कमतरता आहे. पेडण्यातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, जलवाहिनी घालण्यासाठी जमीन संपादनासाठी सहकार्य आवश्यक आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत शून्य तासाला उपस्थित केलेल्या एका सूचनेवर बोलताना काल सांगितले.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मोप विमानतळाला पाणी उपलब्ध करून दिले जात नाही. जलस्रोत खात्याकडून मोप विमानतळाला पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे नागरिकांसाठीचे पाणी वळविण्यात येत असल्याचा आरोप चुकीचा आहे, असेही मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले.
पेडणे भागात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे. टँकरच्या माध्यमातून होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे, असे आमदार आर्लेकर यांनी सांगितले.

पेडणे भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तीन टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी शून्य तासाला बोलताना काल केली.

पशु वैद्यकीय सुविधा
उपलब्ध करा : डॉ. दिव्या राणे

होंडा येथे गुरांसाठी पशु वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी. हिरवा चारा, पशुखाद्य दरात वाढ, मजूर खर्चात वाढ आदीमुळे दूध व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे आमदार राणे यांनी सांगितले.
दुध सोसायट्यांनी ऑटोमॅटीक मिल्कींग मशीनची व्यवस्था केल्यास आधारभूत किंमत वेळेवर देणे शक्य आहे. दूध सोसायट्याकडून दुधाबाबत वेळेवर माहिती मिळत नसल्याने आधारभूर किंमत देण्यास विलंब होत आहे, असे पशुसंर्वधन मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांनी सांगितले.

लाटंबार्से औद्योगिक वसाहतीचे
काम पूर्ण करा : डॉ. चंद्रकांत शेट्ये

डिचोली तालुक्यातील लाटंबार्से येथील नवीन औद्योगिक वसाहतीचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विधासभेत शून्य तासाला बोलताना केली.
लाटंबार्से येथे मागील दहा वर्षे औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, रस्ता, पाणी, वीज आदी कुठल्याही सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत, असे आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले. लाटंबार्से येथे फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

तार नदीतील गाळ
उपसा : केदार नाईक
म्हापसा ग्रीनपार्क व इतर ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून नागरिक व वाहन चालकांना त्रास सहन करावे लागतात. पाणी साचण्याची समस्या सोडविण्यासाठी तार नदीतील गाळ उपसण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी साळगावचे आमदार केदार नाईक यांनी विधानसभेत शून्य तासाला बोलताना केली.

वीज खांबांवरील केबलवर
कारवाई करा : साळकर
वास्को भागातील विजेच्या खाबांवरील केबलमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. वीज खाबांवरील केबलवर कारवाई करून अपघात टाळावेत, अशी मागणी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी विधानसभेत शून्य तासाच्या वेळी केली.