बालरथ कर्मचाऱ्यांचा संप मागे

0
8

>> मुख्यमंत्र्यांकडून चर्चेअंती पगारवाढीचे आश्वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन दिल्याने बालरथ कर्मचाऱ्यांचा नियोजित 27 मार्चचा संप मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती बालरथ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष स्वाती केरकर यांनी काल दिली.

राज्यातील बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ आणि इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येत्या 27 मार्चपासून संप करण्याचा इशारा देण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बालरथ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बालरथ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्तीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती स्वाती केरकर यांनी दिली.

बालरथ ही एक सरकारी योजना आहे. त्यामुळे बालरथ कर्मचाऱ्यांचा पगार व इतर सुविधांबाबत कायद्यामध्ये आवश्यक तरतुदी करण्याची गरज आहे. तसेच, बालरथ कर्मचाऱ्यांना पीएफ सुविधा देण्यासाठी संबंधितांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच, विमा लागू करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, असेही केरकर यांनी सांगितले.