वाहतूक नियमभंगांमुळे अपघातांत वाढ

0
13

>> पोलीस अधीक्षक बॉन्सुएट सिल्वा

वाहतूक नियमांचा सर्रास भंग, भरधाव, बेशिस्त वाहन चालविणे आणि राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे उभारण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक बॉन्सुएट सिल्वा यांनी कार्निव्हल आणि योग शिबिराच्या वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती देताना पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील विविध भागात वाहने भरधाव वेगाने हाकली जात आहेत. अनेक दुचाकी वाहन चालकांकडून हेल्मेट परिधान केले जात नाही. रस्त्यावर पोलीस समोर दिसल्यानंतर काही दुचाकी चालकांकडून हेल्मेट परिधान केले जाते. काही दुचाकी वाहनचालक पोलीस समोर दिसल्यास युटर्न घेऊन परत जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी एकेरी मार्गावर चुकीच्या दिशेने गेल्यास अपघात होण्याची शक्यता असते. तथापि, दुचाकी चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या दिशेने वाहन हाकले जाते. काही वेळी दुचाकी चालकांकडून शॉर्टकटचा वापर केला जातो, असेही वाहतूक पोलीस अधीक्षक सिल्वा यांनी सांगितले.

रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी ठेकेदाराला वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत. तथापि, त्या सूचनांचे योग्य पालन केले जात नाही. रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी वाहन चालकांच्या सोयीसाठी ठेकेदाराने वाहतूक मार्शल नियुक्त करण्याची गरज आहे. याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत, सिल्वा यांनी सांगितले.

योगशिबिर, कार्निव्हल निमित्त वाहतूक व्यवस्था

मिरामार, पणजी येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान योग शिबिर होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 18 फेब्रुवारीला पणजी शहरात कार्निव्हल मिरवणूक होणार आहे. त्या दिवशी दिवजा सर्कल ते कला अकादमीपर्यंतचा मुख्य रस्ता बंद ठेवला जाणार असून शहरातील वाहतूक अंतर्गत भागातून वळविण्यात येणार आहे, अशी माहिती सिल्वा यांनी दिली.
.