संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवार दि. 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार असून, ते दोन टप्प्यात होणार आहे. याच अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत.
या अधिवेशनाची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राद्वारे होईल. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे. त्यानंतर निर्मला सीतारमण 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 1 फेब्रुवारी रोजी सीतारमण 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 13 मार्चपासून अर्थसंकल्पीय दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल.