>> म्हादईप्रश्नी सेव्ह म्हादई फ्रंट आणि ‘आप’चे आवाहन; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी
गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीला वाचविण्यासाठी आता गोमंतकीय जनतेने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करतानाच, राज्यात येत्या 15 दिवसांत म्हादईसाठी तीव्र आंदोलन होऊ शकते, असे संकेत ‘सेव्ह म्हादई फ्रंट’च्या पदाधिकाऱ्यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हादईप्रश्नी सर्वांत प्रथम राजीनामा देऊन या आंदोलनाची सुरुवात करावी, अशी मागणीही फ्रंटने केली आहे. दुसऱ्या बाजूला ‘आप’ने देखील श्रीपाद नाईक यांनी चोवीस तासांत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी म्हादईप्रश्नी जनतेला पोकळ आश्वासने देऊन झुलवत ठेवले आहे. त्यामुळे आता, जनतेने पेटून उठण्याची वेळ आली आहे. जनता गप्प बसली, तर म्हादईचे अस्तित्व राहणार नाही, अशी भीती आपने व्यक्त केली आहे.
सेव्ह म्हादई फ्रंटने म्हादईप्रश्नी विर्डी-साखळी येथे एक सभा घेऊन राज्यातील नागरिकांना जागृत करण्याचे काम केले आहे. आता, म्हादईला वाचविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. राज्यातील नागरिकांकडून म्हादईप्रश्नी करण्यात येणाऱ्या आंदोलनात सेव्ह म्हादई फ्रंट सर्वांत पुढे असणार आहे, असे सेव्ह म्हादई फ्रंटचे प्रमुख कार्यकर्ते ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हादईप्रश्नी अन्याय सहन करणार नसल्याचे वक्तव्य केले होते. आता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर श्रीपाद नाईक यांनी म्हादई रक्षणाची जबाबदारी स्वीकारून स्वत: पहिल्यांदा राजीनामा देण्याची गरज आहे, असेही शिरोडकर म्हणाले.
अमित शहा यांनी बेळगाव येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना म्हादईबाबत केलेले वक्तव्य धक्कादायक आहे. म्हादई जलतंटा न्यायालयात प्रलंबित असताना त्यावर निर्णय जाहीर करून त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असे सेव्ह म्हादई फ्रंटचे महेश म्हांब्रे म्हणाले.
भाजपकडून म्हादईचा राजकीय लाभ उठविण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. 27 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील भेटीत गोव्याच्या शिष्टमंडळाकडून अमित शहा यांना निवेदन सादर करण्याचे नाटक करण्यात आले, असा आरोप म्हांब्रे यांनी केला.
भाजपचे 28 आमदार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर पाच आमदारांनी गोव्याची जीवनदायिनी म्हादईची कर्नाटकला विक्री करून तमाम गोमंतकीय जनतेचा विश्वासघात केला आहे. ज्या भाजपला गोमंतकीयांनी सत्तेवर आणले, त्याच भाजपने म्हादई नदीच्या पाण्याची विक्री करून गोमंतकीयांचा मोठा विश्वासघात केला आहे, अशी टीका देखील म्हांब्रे यांनी केली. या पत्रकार परिषदेला प्रा. प्रजल साखरदांडे यांचीही उपस्थिती होती.
शहांविरोधात अवमान याचिका दाखल करा
सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलतंटा प्रश्न प्रलंबित असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादईचा प्रश्न सोडविल्याची घोषणा केल्याने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, असे थेट आव्हान सेव्ह म्हादई फ्रंटचे प्रमुख कार्यकर्ते महेश म्हांब्रे यांनी दिले.
म्हादईप्रश्नी एकतर्फी निर्णय होताना मुख्यमंत्री गप्प का बसले? : आप
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथील प्रचार सभेत बोलताना म्हादईप्रश्नी केलेले वक्तव्य धक्कादायक आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यात आल्याचे शहांनी म्हटले आहे. केंद्रीय पातळीवर म्हादईप्रश्नी एकतर्फी निर्णय घेतला जात असताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गप्प का बसले, असा सवाल आपच्या नेत्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.
म्हादई आपणाला आईपेक्षा श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या निर्णयाविरोधात बोलण्याचे धाडस दाखविले पाहिजे. अमित शहा यांनी आपल्या भाषणातून सत्य उघड केले आहे. शहा यांनी म्हादईचे पाणी वळविण्यास गोवा सरकारने मान्यता दिल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हादई नदीचे हितरक्षण करण्याचे आश्वासन कोणत्या आधारावर देत आहेत, असा सवालही कुतिन्हो यांनी केला.
भाजपने राजकीय स्वार्थासाठी गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचा बळी देण्याचा निर्णय घेऊन गोव्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यातील सर्व आमदारांनी म्हादईप्रश्नी गोव्याच्या हितरक्षणार्थ सामूहिक राजीनामे देऊन घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करावा. तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी चोवीस तासांत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ॲड. कुतिन्हो यांनी केली.
राज्यातील नागरिकांना म्हादईप्रश्नी जागृत होऊन रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कर्नाटकातील निवडणुकीत राजकीय लाभ उठविण्यासाठी गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचा बळी देण्याचे कटकारस्थान उघड झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.