केपे पोलीस स्थानकात तक्रार दाखल
सांगे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार युरी आलेमांव यांच्या दोन समर्थकांकडून धक्काबुक्की झाल्याची तक्रार फळदेसाई यांनी केपे पोलिसांत नोंदविली आहे.
श्री. फळदेसाई यांनी केपे पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार आपण व जिल्हा पंचायत सदस्य नवनाथ नाईक आडे, मळकर्णे येथे पोहोचलो असता आपण लघुशंकेसाठी गाडीतून उतरलो. यावेळी आपल्यासोबत असलेले जिल्हा पंचायत सदस्य नवनाथ नाईक यांना युरी आलेमांव समर्थक जितेंद्र पाटील व राजेश गावकर याांनी गाडीवर धक्के मारून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपण गाडीजवळ पोहोचलो व आपण त्यांना या प्रकाराबद्दल विचारणा केली असता या दोघांनीही आपल्या कॉलरला पकडून आपल्याला धक्काबुक्की केली असल्याचे त्यांनी तक्रारीत नोंदविले आहे.
सदर प्रकार चालू असतानाच मळकर्णे गावचे नागरिक व भाजपचे कार्यकर्ते दिलीप पावस्कर घटनास्थळी आले. व त्यांनी पाटील व गावकर यांना बाजूला काढले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी फळदेसाई व नाईक यांना जीवंत मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रार दाखल झाल्यावर केपे पोलिसांनी भा.दं.स. ३२३, १४३, ५०४, ५०६ आर डब्ल्यू १४९ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून केपेचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.