राज्यातील गुलाबी थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर भारतातून येणार्या थंड हवेच्या लहरींमुळे दोन दिवसांपूर्वी राजधानी पणजीतील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने खाली आले होते.
काल दिवसभरात पणजीत किमान तापमान हे १७.२, तर मुरगावातील तापमान १८ अंश सेल्सिअस एवढे होते. राजधानी पणजीतील सामान्य तापमानापेक्षा ते २.९ अंश सेल्सिअसने कमी होते, तर मुरगावातील सामान्य तापमानापेक्षा ते ३.८ अंश सेल्सिअसने कमी होते.
जानेवारी महिन्यात पणजीत नोंद झालेले सर्वात कमी तापमान हे १४ अंश सेल्सिअस एवढे असून, त्याची नोंद ३ जानेवारी १९९१ या दिवशी झाली होती, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मुरगाव तालुक्यात सर्वात कमी तापमानाची नोंद ही ७ जानेवारी १९४५ रोजी झाली होती आणि ती १६.७ अंश सेल्सिअस एवढी होती, असेही खात्याकडून सांगण्यात आले.